Shivsena District Chief Kundlik Khande Beed
Shivsena District Chief Kundlik Khande Beed Sarkarnama
मराठवाडा

शिवसेनेने खांडेंना जिल्हाप्रमुख पदावरुन काढले, पण इच्छुकांनाही सलाईनवर ठेवले

Dattatrya Deshmukh

बीड : पक्षांतर्गत विरोधक आपटून बसले मात्र स्वत:वरील पक्षाची मेहरबानी कायम ठेवण्यात यश आलेल्या कुंडलिक खांडे यांना अखेर गुटखा बाधला आणि त्यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखपद गेले. मात्र, पक्षाने नवीन नावाचा सस्पेन्स कायम ठेवून इच्छुकांनाही सलाईनवर ठेवले आहे. अलिकडे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी होत असतानाच पक्षांतर्गत बंडाळी आणि गटबाजीने चांगलेच डोके वर काढले आहे.

काही महिन्यांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांच्या जिल्हाप्रमुख पदावरील निवडीनंतर पक्षातीलच पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने भर रस्त्यात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर या पदाधिकाऱ्याने थेट जाधव यांची निवड रद्द करावी अन्यथा आपण शिवतिर्थावर जिव देऊ अशी भूमिका घेतली.

पक्षातील बड्या नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निपटते न निपटते तोच बीडमध्ये मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जिल्हाप्रमुख स्वत:च्या व्यवसायात मग्न आहेत, त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला वेळ नाही, पाठबळ मिळत नाही, असे गंभीर आरोप केले.

यानंतर आरोप करणाऱ्यांपैकी एका उपजिल्हा प्रमुखावर जिवघेणा हल्लाही झाला. हल्ल्यातील आरोपींपैकी एक पक्षातीलच निघाला. यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली. याच काळात शिवसेनेतील एक गट जिल्हाप्रमुख बदलासाठी मुंबईत तळ ठोकून होता.

मात्र, पक्षाने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर मेहरबानी कायम ठेवली. मात्र, गेल्या आठवड्यात सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्यांच्या गोदामांवर छापे टाकले. यातील एक आरोपी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव पोलिस दफ्तरी नोंदले गेले. याची पक्षाने अखेर गंभीर दखल घेतली आणि सोमवारी (ता. २२) खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

पक्षात जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुकांची अर्धाडझन संख्या असताना नव्या नावाची घोषणा का केली नाही, असा प्रश्न आहे. शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, दिलीप गोरे, बप्पासाहेब घुगे, उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, माजी सभापती युद्धाजित पंडित, गणपत डोईफोडे, अशी काही नावे इच्छुक आणि या पदासाठी चर्चेत आहेत. यावेळी निवडीत पक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मत देखील विचारात घेईल, असे मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT