Beed Shivsena News
Beed Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Beed : शिंदे - फडणवीसांकडून भूमिपुजन अंगलट; क्षीरसागरांशी शिवसेनेने संबंध तोडले

सरकारनामा ब्युरो

बीड : जेष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा व शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यापुढे काहीही संबंध नसल्याची भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. क्षीरसागरांनी शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वत:साठी फायदा घेतला. मात्र, पक्षाला त्यांचा कसलाही फायदा झाला नाही.

त्यांच्या विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. (Beed) मात्र, आता नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुका तोंडावर असताना ते दुरावत असल्याची खंत असल्याचेही शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल जगताप व संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी स्पष्ट केले. (Jaydatta Kshirsagar)

दरम्यान, क्षीरसागर शिवसेनेपासून दुरावत असल्याचे सरकारनामाने यापूर्वीच स्पष्ट केले. क्षीरसागरांचा चकवा कोणाला? शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले! असे वृत्त शुक्रवारीच प्रसिद्ध केले होते.

मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये असलेल्या जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपचा प्रचार केला व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. त्यांना महायुती सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रीपद व बीड विधानसभा मतदार संघातून पक्षाने उमेदवारीही दिली.

मात्र, पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही जयदत्त क्षीरसागर शिवसेना व सत्तेपासून सुरक्षित अंतरावर असल्याचे दिसत होते. त्यांच्या बहुतांशी कार्यक्रमांत व त्यांच्याकडे होणाऱ्या प्रवेशावेळी त्यांच्या गळ्यातील शिवसेनेचा भगवा दुरच असे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील ६९ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे झाले. यात शिंदे गटाची शिवसेना व ठाकरे गटाच्या शिवसेनेतील कोण्याही स्थानिक नेत्यांना निमंत्रण नव्हते. यावरुन क्षीरसागर शिवसेनेतून दुरावत असल्याचे ‘सरकारनामा’ने म्हटले होते.

‘क्षीरसागरांचा चकवा कोणाला? : शिवसेनेत असूनही कार्यक्रमाला शिंदे-फडणवीसांना बोलावले!’ असे वृत्त शुक्रवारीच प्रसिद्ध करताच शनिवारी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. धोंडू पाटील म्हणाले, आम्हाला ते दुरावत असल्याचे सुरुवातीपासून जाणवत होते. अनिल जगताप म्हणाले, आपण दावेदार असतानाही पक्षात आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभेची उमेदवारी दिली, त्यांचे ताकदीने काम केले.

त्यांना आतापर्यंत ११ वेळा भूमिका विचारली होती. मात्र, बघतो, सांगतो असे उत्तर त्यांच्याकडून दिले जाई. शिवसेनेमुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड नगर परिषदेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावाही अनिल जगताप यांनी केला. यापुढे स्थानिकसह सर्व निवडणुका पक्ष ताकदीने लढेल व श्रेष्ठींच्या सुचनांनुसार मतदार संघात काम केले जाईल. यावेळी अप्पासाहेब जगताप, बाळासाहेब पिंगळे, दिलीप गोरे, परमेश्वर सातपुते, विलास महाराज शिंदे, गोरख सिंघन, अशोक सुरवसे, बप्पासाहेब घुगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT