Abdul Sattar-Raosaheb Danve-Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : सत्तार-दानवे वादात, ठाकरे गटाच्या दानवेंची पुन्हा उडी..

Jagdish Pansare

Shivsena UBT Politics News : जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे सत्र काही संपत नाहीत. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचे पाकिस्तान केल्याचा आरोप करत रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपुर्वी खळबळ उडवून दिली होती. तेव्हा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सत्तारांच्या मदतीला धावून आले होते.

आता अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील निल्लोड येथील एका स्वातंत्र्यसैनिकाची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला. यावर पुन्हा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी वादात उडी घेत रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर स्वातंत्र्यसैनिकाची जमीन बळकावल्याचा आरोप केल्याचा दाखला देत अंबादास दानवे यांनी त्यांना डिवचणारी प्रतिक्रिया एस्कवर दिली आहे. मग वाट कसली पाहता रावसाहेब दानवेजी ! पुरावे आल्याशिवाय तुम्ही हा आरोप करत नसाल तर आज तुम्ही त्या पुराव्यांचा लखोटा घेऊन 'सागर' बंगल्यावर असायला हवे होते.

पण कारवाई होईल असे वाटत नाही. कारण 'हिंदुत्वासाठी' सत्तारांचे भाजपच्या लेखी एकूण बलिदान पाहता, स्वातंत्र्यसैनिकाची जमीन वगैरे हे चिल्लर विषय असावेत! असा टोला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे यांच्या भांडणात अंबादास दानवे वारंवार का पडत आहेत? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

गेल्या महिन्यात शिवसंकल्प मोहिमे अंतर्गत अंबादास दानवे यांनी सिल्लोडमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. यावेळी केलेल्या भाषणात अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना उद्देशून केलेल्या टीकेत सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्याची आठवण शिवसैनिकांना करून दिली होती.

सिल्लोडला पाकिस्तान म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा, त्यांच्या भाजप पक्षाचा तुम्ही रस्त्यावर उतरून विरोध का केला नाही? अब्दुल सत्तार यांना उद्देशून जरी दानवेंनी ती टीका केली असेल, पण सिल्लोड पाकिस्तानात आहे का? इथले सगळे मुस्लिम पाकिस्तानी आहेत का? सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी त्याचा अपमान आहे.

असे मुद्दे संघटनेने उचलले पाहिजे, यातून संघटना मोठी होते, तिला बळ मिळते, असे सांगत रावसाहेब दानवे यांना तुम्ही सिल्लोड बंदी करायला पाहिजे होती, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांनी चांगली संधी सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देतांना अंबादास दानवे यांनी भाजप व रावसाहेब दानवे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपला डिवचण्याच्या प्रयत्नात अंबादास दानवे दुसरीकडे सत्तारांची बाजू तर घेत नाहीत ना? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT