Mla Ambadas Danve-Trivedi-Uddhav Thackeray News, Aurangabad  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : दानवेंची प्रगती, पण पक्षाला गळती ?

पक्षात दोन गट आहे हे दानवे-खैरे दोघेही नाकारू शकत नाही. राज्य पातळीवर पक्षात एवढी मोठी फूट पडत असतांना या दोन नेत्यांनी हेवेदावे बाजूला सारून एकत्र काम करणे अपेक्षित आहे. (Mla Ambadas Danve)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची जबाबदारी टाकली. राज्यातील सत्तांतरानंतर संख्याबळाच्या आधारावर दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. (Uddhav Thackeray) ठाकरे यांच्या या निर्णयाने दानवेंचे पक्षात आणि मातोश्रीवरील वजन वाढले असले तरी जिल्ह्यातील (Shivsena) शिवसेनेत मात्र या निवडीमुळे काही नाराजीचे सूर उमटत आहेत.

अंबादास दानवे शिवसेनेत एक एक पायरी पुढे चढत असतांना पक्षाला मात्र गळती लागू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबंडामुळे आधीच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. (Aurangabad) दुसरीकडे आता पक्षातंर्गत गटबाजीतून देखील शिंदे गटाच्या गळाला अनेक पदाधिकारी लागत आहेत. शिवसेनेत झालेल्या फुटीचे रुपांतर भगदाड पडण्यात होऊ नये याची खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पडझडीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्याचे धोरण ठेवले आहे.

जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे ठाकरे यांच्या गुडबुकमधले म्हणून ओळखले जातात. गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हाप्रमुख म्हणून दानवे यांनी पक्षावर आपली मजबुत पकड मिळवली आहे. ती मिळवतांना त्यांनी स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्याशी संघर्ष देखील केला. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तर जिल्ह्यातील शिवसेनेची एकहाती सुत्र दानवे यांच्या हाती गेल्याचे पहायला मिळाले.

मातोश्रीवरून दानवेंना बळ मिळत असतांना खैरेंना देखील गोंजारण्याचे काम झाले. खैरे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना दुखावू नका, असा आदेशच ठाकरेंनी दिल्यामुळे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर तीन दिवसांनी दानवेंनी खैरेची भेट घेतली होती. जिल्ह्यातील शिवसेनेत खैरे विरुद्ध दानवे वाद पक्षातील पदाधिकारी व शिवसैनिकांसाठी नवा नाही. खैरे यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवली, तर दानवे यांनी केवळ शहरच नाही तर जिल्ह्यात आपले समर्थक निर्माण करत खैरेंना शह दिला.

औरंगाबाद जिल्ह्याला दोन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले होते, पैकी शहर आणि महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी अंबादास दानवे यांच्याकडे तर ग्रामीण भागातील कन्नड, सिल्लोड, फुलंब्री या मतदारसंघाची धुरा ही खैरेंचे चाहते नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु या दोघांची तुलना केली तर दानवे अधिक उजवे ठरले. त्रिवेंदी यांना आपली छाप पाडता आली नाही, पण खैरेंच्या आशिर्वादामुळे ते पदावर टिकून होते.

शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेतील पदाधिकारी त्या गटात सहभागी होत आहेत. त्यात आता खैरे समर्थक नरेंद्र त्रिवेदी, माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आदींचा समावेश आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करतांना नरेंद्र त्रिवेदी यांनी दानवे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतच पक्ष सोडला. आता त्रिवेदी यांनी आपणहून शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली? की मग दानवेंना पद मिळत असल्याने जिल्ह्यात नाराजी आहे, हा संदेश देण्यासाठी ही खेळी केली गेली? हे लवकरच स्पष्ट होईल.

मातोश्रीने समतोल साधावा..

दानवे-खैरे यांनी त्रिवेदींच्या पक्ष सोडण्यावर थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात दानवे यांनी केलेली प्रतिक्रिया थेट त्रिवेंदीच्या आतापर्यंतच्या कार्यकाळावर बोट ठेवणारीच होती. जिल्हाप्रमुख म्हणून त्रिवेदी यांचे अस्तित्व दिसलेच नाही हे कोणीही मान्य करेल. जिल्ह्याला दोन जिल्हाप्रमुख आहेत हेच लोकांच्या लक्षात नव्हते एवढा दोघांच्या कार्यपद्धतीत फरक होता. पण एकीकडे पक्षात दानवेंना पद, मान मिळत असतांना जिल्ह्यातील शिवसेना फुटणे हे काही चांगले लक्षण निश्चितच नाहीत.

पक्षात दोन गट आहे हे दानवे-खैरे दोघेही नाकारू शकत नाही. राज्य पातळीवर पक्षात एवढी मोठी फूट पडत असतांना या दोन नेत्यांनी हेवेदावे बाजूला सारून एकत्र काम करणे अपेक्षित आहे. ते झाले नाही तर पुढे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढू शकते. मातोश्री आणि मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी देखील पद आणि जबाबदाऱ्या देतांना समतोल साधला तर पक्षातंर्गत नाराजी काहीसी दूर करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. समोर भाजप, शिंदे गट, मनसेचे आव्हान असतांना पक्षाला लागलेली गळती शिवसेनेला महागात पडू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT