Shiv Sena leaders during Deputy Mayor election developments in Chhatrapati Sambhajinagar, highlighting internal party conflict over Rajendra Janjal’s candidature and official instructions from party leadership. Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

Rajendra Janjal : छत्रपती संभाजीनगर उपमहापौर निवडणुकीत राजेंद्र जंजाळ यांच्या नावावरून शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला असून, पक्षशिस्त राखण्यासाठी नेतृत्वाकडून ‘आदेशाचे पालन करा’ असे पत्र जारी करण्यात आले आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजप बहुमताजवळ असताना त्यांनी युती धर्म पाळत शिवसेनेला सत्तेत सोबत घेत उपमहापौर पद देऊ केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. परंतु पालकमंत्री संजय शिरसाट यांना विश्वासात न घेता परस्पर नाव ठरवून संपर्क नेते पारकर यांच्या मार्फत निरोप देण्यात आल्याने पक्षात वाद निर्माण झाला. जंजाळ यांच्याविरोधात शिरसाट यांच्या सांगण्यावरून माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला.

या अंतर्गत गटबाजीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर संतापल्याचे बोलले जात आहे. उपमहापौर पदाच्या निवडीत गडबड नको म्हणून तातडीने शिवसेना सचिव संजय मोरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, पदाधिकाऱ्यांना 'आदेशाचे पालन करा' अशा सक्त सूचना देणारे पत्र पाठवले आहे.

'शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानूसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे. तरी छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवक यांनी नोंद घ्यावी व आदेशाचे पालन करावे', असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेत पुन्हा राजेंद्र जंजाळ यांच्या नावावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज दाखल केलेला असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनीही शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेत स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर पदासह उपमहापौर व सर्वच पदांवर भाजप दावा सांगले असा अंदाज होता. परंतु राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेत असल्यामुळे भाजपने उपमहापौर पद देत शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.

उपमहापौर पदावर राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. परंतु जिल्ह्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांना नडणाऱ्या जंजाळ यांच्या नावाला पक्षातील संजय शिरसाट गटाकडून विरोध आहे. त्यामुळेच महायुतीच्या महापौर, उपमहापौराच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट गैरहजर राहिल्याचे बोलले जाते. ते जिल्हा परिषदेच्या प्रचारात असल्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना सांगितले.

प्रत्यक्षात संजय शिरसाट हे आपल्या घरी समर्थक नगरसेवकांसोबत चर्चा करत होते, अशी माहिती आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांना नडणाऱ्या राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौर पदावर वर्णी लागल्याने संजय शिरसाट यांचा गट नाराज झाला आहे. या नाराजीतूनच त्र्यंबक तुपे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर ' आदेशाचे पालन करा' अशी सक्त ताकीद देणारे पत्रच शिवसेना सचिवांनी पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT