Chandrakant Khaire-Abdul Sattar News, Aurangabad
Chandrakant Khaire-Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : तेव्हा खैरे म्हणाले होते, सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देवू नका..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : युवासनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली छोटा पप्पूची उपमा शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरून आता उद्धवसेना विरुद्ध अब्दुल सत्तार असा संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार २०२४ मध्ये कसे निवडून येतात तेच पाहतो? अशा शब्दात आव्हान दिले आहे, तर जे स्वतः पराभूत झालेले आहेत, ते मला काय पाडणार? असा पलटवार सत्तारांनी केला.

एकंदरित सत्तार विरुद्ध खैरे (Chandrakant Khaire) असा सामना आणखी काही दिवस सुरू राहील असे दिसते. या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्यावेळी तेव्हा शिवसेनेत व आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या सत्तारांनी मातोश्रीचा आदेश धुडकावून लावत वेगळी भूमिका घेतली होती, याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. (Abdul Sattar)

राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान काॅंग्रेसला द्यावा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. परंतु सत्तारांची तशी इच्छा नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्याच देवयानी डोणगांवकर यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण केले होते.

पण समसमान मते पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर काॅंग्रेसला अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यावेळी चंद्रकांत खैरे हे अब्दुल सत्तार यांच्यावर भडकले होते. हा हिरवा साप आहे, याला पुन्हा मातोश्रीची पायरी चढू देवू नका, अशी मागणीच खैरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली होती.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका झाल्यानंतर खैरेंनी पुन्हा एकदा सत्तार यांचा उल्लेख हिरवा, नतंर भगवा झालेला साप आणि आता सरडा असा केला. सत्तारांवर खैरेंनी भ्रष्टाचाराचे आणि लोकांच्या जमीनी बळकावल्याचे गंभीर आरोप करत आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचे देखील म्हटले आहे.

फडणवीस यांनीच सत्तार यांना शिवसेनेत ढकलले, असा दावा देखील खैरे यांनी केला. सत्तार यांना कीक आऊट करा, त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, त्यांच्यामुळे सरकारची अब्रू जात आहे, अशी मागणी देखील खैरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक होत खैरे मातोश्रीच्या आणखी जवळ जाऊ पाहत असल्याची देखील चर्चा या निमित्ताने होत आहे.

भाजपच्या वाटेवर असलेल्या सत्तारांना फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवले तेव्हा सेनेतील एक गट देखील नाराज होता. पण उद्धव ठाकरेंपुढे त्यांचे काही चालले नाही. शिंदे बंडात सहभागी होत सत्तारांनी आपला खरा चेहरा दाखवून दिला होता, असे देखील आता शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT