Shivsena Leader Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : खैरे म्हणतात, पाच आमदारांनी गद्दारी केल्यापासून माझ्यावर कामाचा लोड..

Khaire : माझ्याकडे खूप काम आहे, मी रोज सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लोकांची कामे करण्यासाठी फिरत असतो.

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Khaire News : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे विरुद्ध ठाकरे गट एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले आहेत. Shivsena ठाकरे गट शिंदे गटाला खोके सरकार, बेईमान सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत सातत्याने डिवचत आहे. तर त्याला शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे.

ठाकरे गटाची बाजू शिवसेनेचे देश आणि राज्यपातळीवरचे नेते सांभाळत आहेत. इकडे मराठवाड्यात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर ती जबाबदारी आहे. त्यामुळे खैरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. (Marathwada) शिंदे गटाकडून टीका झाली की, त्याला खैरेंकडून प्रत्युत्तर आलेच म्हणून समजा.

सध्या शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात समावेश व्हावा म्हणून वेटिंगवर असलेल्या बच्चू कडू यांची एक महत्वाची मागणी सरकारने मान्य केली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल बच्चू कडू यांचे अभिनंदन करतांना खैरे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. कडू यांनी काही दिवसांपुर्वी खैरे यांच्याकडून शिंदे गटावर होणाऱ्या टीकेला उत्तर देतांना त्यांना आता काही काम नसल्याचा टोला लगावला होता.

त्याचा संदर्भ देत खैरे म्हणाले, शिंदे यांनी बंड केले तेव्हा आमच्या जिल्ह्यातील पाच आमदारांनी गद्दारी केली. त्यांनी गद्दारी केल्यामुळे माझ्यावर कामाचा प्रचंड लोड आहे. गेली वीस वर्ष मी जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटत होतोच. पण आता खासदार नसतांना देखील मी लोकांची कामे करतो. शिवाय सहा पैकी पाच आमदारांनी गद्दारी केल्यामुळे मला त्यांच्या मतदारसंघात देखील लक्ष द्यावे लागते, त्यामुळे बच्चू कडू यांनी माझ्यावर टीका केली असली तरी ती गांभीर्याने केली नाही, तर हसत हसत केली.

माझ्याकडे खूप काम आहे, मी रोज सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लोकांची कामे करण्यासाठी फिरत असतो. त्यामुळे खैरे साहेब तुम्हीच आमचे प्रतिनिधी आहात, असे लोक अजूनही म्हणतात. बच्चू कडू यांच्यामुळे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण त्यांनी तिकडे न राहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावे, असे आवाहन देखील खैरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT