Chandrakant Khaire Warn Shinde News, Aurangabad
Chandrakant Khaire Warn Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : खैरेंचा शिंदे सरकारला इशारा, हवन करून तुमची सत्ता उलथवून टाकतो..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात बंड पुकारून महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या चाळीस समर्थक आमदारांसोबत गुवहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. सरकार येवू दे पुन्हा सगळ्यांना घेऊन दर्शनाला येईन असा नवस तेव्हा त्यांनी बोलला होता. राज्यात सत्तातंर होऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, चार महिन्यानंतर आता शिंदे सरकारमधील ते सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. दक्षिण मुखी मारोतीसमोर आता असे हवन करतो की तुमचे सरकार उलटे पालटे होईल, असा दावा खैरे यांनी केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खैरेंना आमच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला चला अशी आॅफर दिली. त्यानंतर खैरेंनी सावंत यांच्यासह शिंदे (Eknath Shinde) सरकारला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर काय होते ते पहा? मी देखील कामाख्या देवीला जाऊन पुजा घालणार आहे, मग पहा तुमचे सरकार कसे पडते, असा इशारा देखील खैरे यांनी केला आहे.

शिंदे सरकारमधील समर्थक मंत्री, आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आपल्या समर्थक आमदार, मंत्र्यांना घेवून नवसपुर्तीसाठी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदे सरकारवर तुटून पडली आहे.

यातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तुम्ही आमच्यासोबत चला मी, तुम्हाला घ्यायला येतो, असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना डिवचले. त्यावर खैरे यांनी तिखट प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. खैरे म्हणाले, उदय सामंत यांनी मला आॅफर दिली, पण मला त्याची गरज नाही, तुम्ही आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहात, मी २२ वर्षापासून जातो. गद्दारीनंतर तुम्ही सत्ता आणि स्वार्थासाठी तिथे गेला होतात.

त्यानंतर मी जाऊन आलो आणि उद्धव साहेब आणि शिवसेनेसाठी प्रार्थना, पुजा केली आणि तुमचे सरकार अडचणीत आले. आता तुम्ही जाऊन आल्यानंतर मी पुन्हा तिथे जाईन आणि अशी पुजा करेल की तुमचे सरकार उलटे होवून जाईल. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यानंतर बघा काय होते ते? मी दक्षिणमुखी मारोतीसमोर हवन करणार आहे, त्यानंतर तुमचे सरकार राहते का? तेही पहा, असेही खैरे म्हणाले.

मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, पुजाअर्चा, होम-हवन एका श्रद्धेने करत असतो. खोके किंवा स्वार्थासाठी करत नाही, असा टोला देखील त्यांनी शिंदे सरकार व उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला. मी मरेपर्यंत शिवसेनेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचेही खैरे यांनी ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT