Krishna Patil Ashtikar Sarkarnama
मराठवाडा

Nanded DCC Bank: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट; 'आमदारकी'ला पडलेल्या खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांची उमेदवारी अडचणीत

Shivsena MP Nagesh Patil Ashtikar : खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नांदेड जिल्हा बँकेतील उमेदवारीला विरोध करत कोहळीकर यांनी दंड थोपटले आहेत. आता कोहळीकर समर्थक अंतावार यांनी दाखल केलेल्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निकाल देतात? यावर जिल्हा बँकेतील राजकीय समीकरण ठरणार आहेत.

Jagdish Pansare

Nanded News : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले त्यांचे सुपूत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे निवडणूक होईपर्यंत ठाकरे यांच्या पक्षात थांबले. पण तिथे सपाटून मार खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांनाही बाहरेचा रस्ता दाखवला. आता हे दोघे बाप-बेटे नांदेड जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जम बसवू पाहत आहेत. मात्र शिंदेसेनेचे आमदार बाबुराव कोहळेकर यांच्याकडून या प्रयत्नांना खीळ बसवली जात असल्याची चर्चा आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील यांनी हदगांव विकास सहकारी सोसायटीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जावर आमदार बाबुराव कोहळेकर कदम यांच्या जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जावर सूचक असलेल्या गजानन अंतरवार यांनी आक्षेप नोंदवला आहे.

कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना सहकार क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव नाही, खोटी कागदपत्र दाखल करून त्यांनी तो असल्याचा आरोप अंतवार यांनी केला आहे. त्यांनी सादर केलेली अनुभवा संदर्भातील कागदपत्र तपासावीत असा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदवण्यात आला आहे.

गजानन अंतरवार यांनी आष्टी सेवा सहकारी संस्थेची गेल्या पंधरा वर्षातील अधिकृत नोंदी, ठराव व इतर कागदपत्रे सादर केली आहेत. अनुभवाचा पुरावा म्हणून जोडलेल्या एका गृहनिर्माण संस्थेबाबातही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

ही संस्था 2016 मध्येच अवसायनात निघालेली असल्याचे कागदोपत्री पुरावेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूक अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असतानाच हा आक्षेप नोंदवण्यात आल्याने कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील हदगांव-हिमायतनगर या विधानसभा मतदारसंघातून आपले राजकारण करणारे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यातील मतभेद जिल्ह्याला नवे नाहीत. शिवसेनेत फूट पडली तेव्हा बाबुराव कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याविरोधात बाबुराव कदम यांना मैदानात उतरवले होते, पण त्यांचा पराभव झाला. शिंदेंनी पुन्हा त्यांना हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले.

नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतही आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जोर लावला आहे. परंतु नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत. एकमेकांशी राजकीय मतभेद असले तरी ते इतक्या लवकर चव्हाट्यावर येतील असे वाटले नव्हते.

खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नांदेड जिल्हा बँकेतील उमेदवारीला विरोध करत कोहळीकर यांनी दंड थोपटले आहेत. आता कोहळीकर समर्थक अंतावार यांनी दाखल केलेल्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निकाल देतात? यावर जिल्हा बँकेतील राजकीय समीकरण ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT