Mla Pradip Jaiswal-Cm Shinde News, Aurangabad
Mla Pradip Jaiswal-Cm Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : आमदाराच्या हाॅटेलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री औरंगाबादेत..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांवर विरोधकांकडून `पन्नास खोके एकदम ओक्के`, अशी टीका केली जाते. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ५० आमदारांनी बंड पुकारले होते, तेव्हा शहाजी बापू पाटील यांनी सुरत, गुवाहाटी मधील प्रवासाचे वर्णन करतांना `काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटेल समद कस ओक्के हाय`, अशी डायलाॅगबाजी करत देशभरात प्रसिद्धी मिळवली होती.

आता शिंदे गटाच्या एका आमदारानेच शानदार हाॅटेल सुरू केले आहे, त्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आज औरंगाबादेत येत आहेत. (Aurangabad) औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradip Jaiswal) यांनी शहरालगत धुळे-सोलापूर मार्गावर `ग्रॅन्ड सरोवर`, नावाचे हाॅटेल सुरू केले आहे. प्रदीप जैस्वाल हे व्यावसायिक कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडिलोपार्जीत व्यवसाय असून ते राजकारण सांभाळत असतांना पिढीजात व्यवसाय देखील करतात.

आता त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांची दोन्ही मुले हा व्यवसाय सांभाळतात. हे हाॅटले देखील जैस्वाल यांनी आपल्या मुलांसाठी उभारल्याचे बोलले जाते. विरोधकांकडून सातत्याने टीका होत असली तरी या हाॅटेलचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात हाॅटेल आणि वाईनबारची चर्चा जोरात सुरू आहे.

शिंदेंसोबत गेलेले आणि सध्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्या वाईनबारचा विषय मध्यंतरी चांगलाच गाजला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार यांनी जाहीर भाषणातून याचा उल्लेख करत भुमरे यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे हे आणखी एका आमदाराच्या हाॅटेलच्या उद्घाटनासाठी येत असल्याने त्या जुन्या चर्चांची नव्याने चर्चा होत आहे एवढेच.

प्रदीप जैस्वाल हे बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनचे जुने शिवसैनिक. २५-३० वर्षापासून ते राजकारणात आहेत. नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. शिंदेनी केलेल्या बंडात जैस्वाल सहभागी झाले, पण ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल आतापर्यंत त्यांनी कधीही टीका केली नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून देखील त्यांना फारसे लक्ष्य केले जात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT