मराठवाडा

Shivsena News : झेडपीतील नाचक्कीला पालकमंत्री शिरसाट, खासदार भुमरे की आमदार सत्तार जबाबदार?

महाराष्ट्रातील झेडपी वादावरून शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पालकमंत्री शिरसाट, खासदार भुमरे की आमदार सत्तार यापैकी नेमका जबाबदार कोण? सविस्तर वाचा.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajingar ZP Election News : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्ष फुटीनंतर शिवसेना पक्षाची दुसऱ्यांदा नाचक्की झाली आहे. विधानसभेत जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार निवडून आणत मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला हे मोठेपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र टिकवता आले नाही.

जिल्ह्याचे पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे, संदीपान भुमरे यांच्या रुपाने मराठवाड्यातील महायुतीचा एकमेव खासदार शिवसेनेचा आणि कुठल्याही परिस्थितीत राजकीय गेम फिरवण्यात पटाईत असलेला अब्दुल सत्तार यांच्यासारखा आमदार असतांना झेडपी निवडणुकीत पक्षाची नाचक्की झाली. पक्षांतर्गत गटबाजी, सगळी पद आपल्याच मुला-मुली-पुतण्या आणि नातेवाईकांना मिळावी या नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाने पक्षाची अवस्था 'ना घर का, ना घाटा का' अशी झाली आहे.

या उलट भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी वैयक्तिक मतभेद, पक्षातील गटाबाजी, नाराजीचा परिणाम कुठेही पक्षाला मिळणाऱ्या सत्तेवर होणार नाही याची काळजी घेतली. परिणामी शिंदेंच्या शिवसेनेतील स्वतःला धुरंधर समजणाऱ्या नेत्यांच्या खेळी धुळीत मिळवत भाजपाने अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आणत जिल्हा परिषदेवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. भाजपाला मिळालेले हे यश त्यांच्या सुनियोजित राजकीय खेळी पेक्षाही शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या घालण्याच्या राजकारणाचे म्हणावे लागेल.

पालकमंत्री अलिप्त..

महापालिका निवडणुकीत मुलगा, मुलीला नगरसेवक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या दोघांपैकी एकाला उपमहापौर करण्यासाठी फिल्डिंग लावली. पण जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी फिक्स करून आणली. जिल्हाप्रमुखांकडून मात खाली लागल्याने पुढे शिरसाट या सगळ्या प्रक्रियेपासून दूरच राहिले.

भुमरे पिता-पुत्रही फेल

जिल्हा परिषदेची सगळी सूत्रं खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे या पिता-पुत्र आणि शेवटच्या क्षणी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हाती दिली गेली. भाजपसोबत युती असली तरी पहिले अडीच वर्ष अध्यक्ष पद हे आपल्या घरात म्हणते पुतण्या शिवराज भुमरेला मिळावे यासाठी खासदार-आमदारांनी आग्रह धरला. त्यासाठी युती पणाला लावली. तर तिकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाचे काही जमते का? याची चाचपणी करत या बंडाला हवा दिली.

पहिली अडीच वर्ष अध्यक्ष पद भाजपा द्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर थेट शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांना गळाला लावून सत्ता, अध्यक्ष, उपाध्यक्ष व महत्वाची सभापती पद राखण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिक पातळीवर सगळं जमलं असं चित्र निर्माण करून या खेळीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संमतीही मिळवली. मग सुरू झाला सहलींचा प्रवास, पण भाजपाच्या स्थानिक धुर्त नेत्यांनी हे आधीच हेरले होते.

बंब-सावेंनी डाव उधळला..

भाजपाचे मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार भागवत कराड यांनी या सगळ्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. शिवसेनेशिवाय अध्यक्ष, उपाध्यक्ष कसा होऊ शकतो, याचे गणित त्यांच्यासमोर मांडले. मग फडणवीसांनीही शिंदेंच्या शिवसेनेची खोड मोडण्यासाठी परवानगी दिली. पुढची मोहिम सावे-बंब या जोडीने फत्ते केली. मग शिवसेनेच्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ आली. मग केसाने गळा कापला, विश्वास घात केल्याची भाषा सुरू झाली.

या सगळ्या घडामोडींवरून एकच सिध्द होते की आजही राजकीय पटलावर भाजपा हा शिवसेनेला वरचढ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला हळूहळू पोखरत भाजपाने आता पूर्णपणे उद्धवस्त केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. याला शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व, पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील आमदारही तितकेच जबाबदार आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT