औरंगाबाद : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात फिरत आहेत. Shivsena शिवसेनेत दाखल होत थेट उपनेते पदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अंधारे जीवतोडून भाषणे ठोकत आहेत. शिवसेनेचे नेते आणि फायरब्रॅन्ड नेते अशी ओळख असलेले Sanjay raut संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना शिवसेना नेत्यांची दमछाक होत होती.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे एकहाती किल्ला लढवत होते. अशावेळी सुषमा अंधारे ज्या आक्रमक भाषणासाठी ओळखल्या जातात त्याचा फायदा (Shivsena) शिवसेनेने करून घेण्याचे ठरवले आणि अंधारे यांना देखील स्वतःला सिद्ध करण्याची ही चालून आलेली संधी होती.
त्यामुळे शिंदे गटातील आमदार व मंत्र्यांवर अंधारे या जोरदार हल्ला चढवत आहे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, (Abdul Sattar) संदीपान भुमरे हे मंत्री तर अंधारे आणि शिवसेनेच्या निशाण्यावर आहेतच. त्यामुळे या मंत्र्यांच्या मतदारसंघात खास महाप्रबोधन यात्रेचे आयोजन आणि अंधारेंच्या भाषणाचा कार्यक्रम आखला गेला.
अंधारे दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी संदीपान भुमरेंच्या पैठण आणि सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात सभा घेतल्या आणि दोघांचीही पिसे काढली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवलेली जबाबदारी अंधारे या नेटाने पार पाडत असल्याचे त्यांच्या आक्रमक भाषणातून दिसून आले.
पैठणमध्ये अंधारे यांनी भुमरे यांच्या २५-३० वर्षाच्या कारभारावर बोट ठेवत तालुक्यात विकास झाला नाही, उलट भुमरेंनी नऊ दारूची दुकाने सुरू करून वेगळाच विकास केल्याचा टोला लगावला. यावर लगोलग भुमरेंनी प्रत्युत्तर दिले खरे, पण ते देतांना त्यांची दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.
तर तिकडे सिल्लोडमध्ये जाऊन अंधारे यांनी सत्तारांनाही आव्हान दिले. मला केव्हाही बोलवा मी एकटी तुमच्या विरोधात लढा द्यायला तयार असल्याचे सांगत अंधारे यांनी सत्तारांच्या कामाचा पंचनामा केला. सातत्याने पक्ष बदलण्याची त्यांची सवय यावरून तुम्ही आपल्या घरवालीचे तरी आहात का? असा टोला अंधारे यांनी लगावला होता. शिंदे बडांमध्ये सत्तार-भुमरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांना सळो की पळो करून सोडण्याची रणनिती आखण्यात आली आहे.अंधारे यांचे भाषण आणि त्याचा प्रभाव किती दिवस राहील हे जरी सांगता येत नसले तरी सातत्याने दौरे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे मतदारांच्या मनात भुमरे-सत्तार यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे काम शिवसेनेने हाती घेतले आहे.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून सत्तारांनी मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा आयोजित केली होती. एका अर्थाने सत्तारांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा धसका घेतला होता. त्या तुलनेत अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेला मात्र त्यांनी फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. कारण अद्याप सत्तार यांनी अंधारे यांच्या टीकेवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेले नाही. भुमरेंनी मात्र आपल्यावर विकासकामे केली नसल्याची टीका झाल्यामुळे त्याला मात्र प्रत्युत्तर देत आक्रमक पावित्रा घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.