Chandrakant Khaire Vist Sillod News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : ठाकरेंच्या सिल्लोड दौऱ्याचा घोळ संपेना ; सभा नाही, पण संवाद साधणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे ७ नाव्हेंबर रोजी पुर्वनियोजित दौऱ्यानुसार येणार आहेत. परंतु त्यांची जाहीर सभा मात्र रद्द करण्यात आली आहे. एकीकडे सभा रद्द झाल्याचे नेते सांगत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सिल्लोडच्या आंबेडकर चौकात शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) हे सिल्लोडमध्ये दाखल झाले असून त्यांनी आंबेडकर चौकातील जागेची पाहणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत केली. (Shivsena) सभा रद्द, संवाद साधणार असे सांगितले जात असल्याने ठाकरेंच्या दौऱ्याचा घोळ अजूनही मिटलेला नाही असे दिसते.

अब्दुल सत्तार यांनी आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचे आयोजन सिल्लोडमध्ये करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनी त्याच दिवशी शहरात खासदार एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. दोन्ही कार्यक्रमांची वेळ एकच असल्याने पोलिसांनी आधी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आणि नंतर त्यांना आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानात सभा घेण्याचा पर्याय सुचवला. तशी परवानगी देखील दिली.

मात्र आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे शिवसेनेकडून सांगितले गेले. शिवाय आंबेडकर चौकात होणारा त्याचा सत्कार देखील रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणीसाठी हा दौरा असल्याने आदित्य ठाकरे कुठलाही सत्कार स्वीकारणार नसल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

मग आंबेडकर चौकातील जागेची पाहणी कशासाठी? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे इथे लोकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय लिहाखेडी येथे शिवसंवाद दौरा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी ठाकरे करणार असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. आता जरी आदित्य ठाकरेंची सभा होणार नसली, तरी पुढे सिल्लोडमध्ये आम्ही सभा घेणारच, असेही खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT