Aditya Thackeray-Abdul Sattar News Aurangabad
Aditya Thackeray-Abdul Sattar News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सत्तारांच्या मतदारसंघात का नाही ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून ठाणे, भिवंडी, मनमाड, नाशिक मराठवाड्यातील (Aurangabad)औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर, नगर जिल्ह्यातील शिर्डी, नेवासा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या विरोधात गद्दारी करून जे शिंदे गटासोबत गेले त्या आमदारांच्या मतदारसंघात धडक देत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोर आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल यांच्या मतदारसंघात (Aditya Thackeray) ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. पैठणमध्ये तर आदित्य ठाकरे यांना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. पण या दौऱ्यांतून अब्दूल सत्तार (Abdul Sattar) यांचा सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ मात्र वगळण्यात आला.

विधानसभा निवडणुकीपुर्वी सत्तार शिवसेनेत आले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी केवळ मतदारसंघच नाही तर जिल्हा बॅंक, जिल्हा दुध संघात देखील शिवसेनेला चांगले यश मिळवून दिले. शिवसेनेने देखील मोठ्या आशेने एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून सत्तार यांना पक्षात घेताच राज्यमंत्री पद दिले. मात्र अडीच वर्षातच सत्तार यांनी पक्षाशी गद्दारी करत शिंदेशी हातमिळवणी केली.

जिल्ह्यातील सगळ्याच बंडखोरांचा समाचार घेत असतांना आदित्य ठाकरेंनी सत्तारांना कसे सोडले ? याबद्दल राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी टीका केली खरी, पण त्याला फारशी धार दिसली नाही. अब्दुल सत्तार हे मुळचे शिवसैनिक नव्हते, हम करे सो कायदा अशी त्यांची राजकारणाची पद्धत आतापर्यंत पहायला मिळाली.

काॅंग्रेसमध्ये मनाविरुद्ध होताच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपमध्ये जाताजाता ते शिवसेनेत आले आणि संपुर्ण मतदारसंघ शिवसेनामय, भगवा केल्याचे चित्र उभे केले. पण सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात सत्तार हेच पक्ष आहेत याची जाणीव शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना असल्यामुळेच कदाचित त्यांनी सत्तार यांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शनचा प्रयत्न टाळला असावा.

कदाचित आदित्य ठाकरे सत्तारांच्या मतदारसंघात गेले असते तर त्यांचे शक्तीप्रदर्शन फसले असते किंवा तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला असता. तसे पाहिले तर सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे असल्यामुळे शिवसेनेने तिथे कधी पक्ष संघटन वाढवलेच नाही. शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा शिवसेनेने २०१४ मध्ये भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराला उभे केले होते, मात्र त्याचा पराभव झाला. आदित्य ठाकरे खास हेलीकाॅप्टरने तेव्हा प्रचाराला सिल्लोडला आले होते.

सत्तार यांच्या जेमतेम अडीच वर्षाच्या शिवसेनेतील प्रवासात त्यांनी मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्यापेक्षा आपला खुंटा अधिक बळकट कसा करता येईल यासाठीच प्रयत्न केले. त्यामुळे सत्तारांची गद्दारी शिवसेनेने फारशी मनावर घेतलेली नाही, हेच यावरून स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT