Mp Imtiaz Jalil Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखी एकजूट दाखवा, सगळे प्रश्न सुटतील..

(Aimim)हा शिवसेनेचा, तो भाजपचा, एमआयएमचा(Mp Imtiaz Jalil) असा भेदभाव करत राहिलो तर प्रश्न कधीच सुटू शकणार नाही.

जगदीश पानसरे :सरकारनामा

औरंगाबाद ः आपल्या भागातील सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखी एकजूट दाखवा. हा शिवसेनेचा, तो भाजपचा, एमआयएमचा असा भेदभाव करत राहिलो तर प्रश्न कधीच सुटू शकणार नाही. एकजूट दाखवून दबाव निर्माण केला तरच प्रश्न सुटू शकतील, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

वैजापूर तालुक्यातील वाकला येथे गावकऱ्यांशी ते बोलत होते. लोकांच्या प्रश्नावर मी इतका भांडतो की सरकारी अधिकाऱ्यांनी आता मला ब्लॅकलिस्ट करुन टाकले आहे, असेही ते म्हणाले. खासदार इम्तियाज जलील हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दौरा करत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व त्यांना भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करत असतांना ते लोकांशी संवाद साधत आहेत.

इम्तियाज जलील म्हणाले, मी खासदार झालो त्याला आता अडीच वर्ष झाले आहे. मी निवडून आल्यानंतर तुम्हाला अनेक आश्वासनं दिली. रस्ते, पाणी, चांगल्या शाळा, सुविधा, घरं या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडलेला नाही. पण कोरोना सारख्या जागतिक महामारीने देश संकटात सापडला, आम्हाला मिळणारा विकास निधी गोठवण्यात आला. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तात अद्याप करता आलेली नाही.

संसदेत जेव्हा आम्ही पंतप्रधानांना प्रश्न विचारतो, की लोकांना निवडणुकीत दिलेली आश्वासन पुर्ण कशी करावी, त्यांना जाऊन काय सांगावे, तर ते म्हणतात भाषण करा. अशी परिस्थिती आहे, पण आता हळूहळू सगंळ सुरळीत होत आहे, खासदार निधीही मिळेल तेव्हा तुमची कामे करण्याला माझ्ये प्राधान्य असेल. वैजापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मी नुकताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत मांडला. त्यांनी देखील तो सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

पण आपल्या भागातील विकासाचे प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर त्याच राजकारण न आणता एकत्रितपणे लढले पाहिजे. याबाबतीत आपण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा आदर्श घ्यायला हवा. वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी विकासासाठी ते सगळे मतभेद बाजूला सारून एकत्र येतात, दबावगट निर्माण करतात आणि आपल्या भागाचा विकास करून घेतात.

आपल्याकडे मात्र तो एमआयएमचा आहे, त्याच्या मागे कशाला जायचे?असे बोलले जाते. आपल्यालाही एकजूट आणि दबाव निर्माण करावा लागेल, तेव्हाच सगळे प्रश्न सुटू शकतील. गावकऱ्यांनी देखील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले.

या भागात रस्त्याने येतांना मला शकडो टन टोमॅटो रस्त्याच्या बाजूला टाकलेला दिसला. मी त्याचे व्हिडिओ काढले आहेत, ते आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवणार आहे. पाच रुपये किलो भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या टोमॅटोची खरेदी २५ रुपये दराने करायला पाहिजे, अशी अपेक्षाही इम्तियाज यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT