Chhatrapati Sambhaji Nagar Zilla Parishad  Sarkarnama
मराठवाडा

School News: अनुदानित शाळांतील कर्मचारी संस्थाचालकांचे घरीगडी, वाहनचालक; स्थायी समितीने दिले चौकशीचे आदेश

Chhatrapati Sambhaji Nagar: विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणि शाळांचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालविण्यासाठी शासनाकडून वेतन दिले जाते.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar: विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणि शाळांचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालविण्यासाठी शासनाकडून वेतन दिले जाते. मात्र, याच अनुदानित शाळांमधील काही कर्मचाऱ्यांचा वापर संस्थाचालकांच्या खासगी कामांसाठी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कुणी घरगडी, कुणी वाहनचालक, तर काही कर्मचारी संस्थाचालकांच्या उद्योग-व्यवसायात काम करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावर सर्व अनुदानित शाळांची तपासणी करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले.

जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. ४) स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य संजय निकम यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. अनुदानित शाळांतील शिक्षक, तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, कारकून आणि शिपाई अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या तिजोरीतून अदा केले जाते. मात्र, हे कर्मचारी प्रत्यक्षात शाळेत काम करतात की संस्थाचालकांच्या वैयक्तिक कामांसाठी त्यांची नियुक्ती केली जाते, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.

वैजापूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर शाळेतील कर्मचारी काम करत असल्याचा प्रकार समोर आल्याने या आरोपांना गांभीर्य प्राप्त झाले आहे. शासनाकडून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या जात नसतील, तर हा सार्वजनिक निधीच्या गैरवापराचा प्रश्न असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी न्यायालयीन प्रकरणामुळे बैठकीला अनुपस्थित असल्याने या आरोपांवर शिक्षण विभागाला तत्काळ स्पष्टीकरण देता आले नाही.

शाळांतील मंजूर पदे, प्रत्यक्ष कर्मचारी तपासणार

या प्रकरणानंतर स्थायी समितीने जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मंजूर पदांवर नियुक्त असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहून काम करतात का, याची तपासणी करावी. त्याचा सविस्तर अहवाल पुढील स्थायी समितीच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेत मंजूर आणि कार्यरत शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या नावांचा फलक लावण्याचीही मागणी बैठकीत करण्यात आली. त्यामुळे स्थायी समितीच्या या आदेशामुळे आता तपासणीतून अनुदानित शाळांमधील कर्मचारी व्यवस्थेचे वास्तव समोर येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT