Beed : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा राज्यात सुरु आहे. अंधारे या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. प्रबोधन यात्रेद्वारे अंधारे या सातत्यानं राज्यातील शिंदे फडणवीस सरकार, शिंदे गटातील नेतेमंडळींवर जोरदार हल्लाबोल करत असतात. आता त्यांची महाप्रबोधन यात्रेतील सभा बीड जिल्ह्यात होत आहे. याचवेळी अंधारेवर ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा आरोप विरोधकांकडून नव्हे तर त्यांच्यात पक्षातील पदाधिकाऱ्यानेच केला आहे.
बीड शहरातील महाप्रबोधन यात्रे(Mahaprabodhan Yatra)ची सभा शनिवारी (दि.२०) होणार आहे. यादरम्यानच ठाकरे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रबोधन यात्रेच्या सभेच्या स्टेजची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाची धडाडती तोफ सुषमा अंधारे या आल्या होत्या. ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. याचदरम्यान अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केला आहे.
अंधारेंनी आरोप फेटाळला...
शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुख असलेल्या अप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्याचा दावा खुद्द अप्पासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केला आहे.तसेच अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, फर्निचरसाठी पैसे मागतात, पक्षातील पदे विकत असून आपले पद देखील त्यांनी विक्रीत काढल्याचा आरोप जाधव यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.
अंधारेंनी जाधवांचा दावा फेटाळलाच म्हणाल्या....
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आप्पासाहेब जाधव(Appasaheb Jadhav) यांचा मारहाण झाल्याचा दावा फेटाळला आहे. त्या म्हणाल्या, मला कुठलीही मारहाण झालेली नाही. पण जर एखादा जिल्हाप्रमुख महिलेवर हात उचलल्याचं असं जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हाप्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाकडून अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय असा आरोप अंधारे यांनी यावेळी केला आहे.
प्रबोधन सभेला गालबोट लावण्यासाठीच...
आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव यांनी काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडिओ जाहीर केला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आहे. तसेच बीड येथील शनिवारी(दि.२०) होणार्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाच्या सभेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटानं ही स्क्रिप्ट रचल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे. यावेळी महाप्रबोधन यात्रा दणक्यात होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुखपदावरुन जाधवांची हकालपट्टी...
गटातटाच्या वादातून सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तर अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. मात्र, या घटनेची आता ठाकरे गटाकडून गंभीर दखल घेण्यात आली. तसेच अप्पासाहेब जाधव यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.