Imtiaz Jaleel-Ramgiri Maharaj-Nitesh Rane Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : 'एमआयएम'चा सरकारला 'अल्टिमेटम'; महंत रामगिरी, राणेंवर कारवाई करा, नाहीतर..

Jagdish Pansare

AIMIM Maharashtra Political News : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. यासाठी आम्ही पाच दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत, त्यानंतर तिरंगा झेंडा घेऊन मुंबईत धडकू, अशा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. महिनाभरापुर्वी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. तर भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार भडकाऊ भाषा वापरून विशिष्ट समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

राज्यात आणि देशात अल्पसंख्याक समाजावर हल्ले, संशयावरून जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (Imtiaz Jaleel) या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आणि संतापाची लाट आहे. राज्यात आणि केंद्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. हा देश घटनेवर चालतो याचा विसर बहुदा सत्ताधाऱ्यांना पडला आहे. त्यांना संविधानाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्ही मुंबईत धडकणार आहोत, असेही इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

रामगिरी महाराज यांनी सरकारच्या सांगण्यावरून इस्लामिविरोधी वक्तव्य केले, पण या सरकारकडूनच त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला. आमदार नितेश राणे स्वतःला गब्बर म्हणवून घेत आहेत, पण शोलेमधील गब्बरचे शेवटी काय होते ? ते त्यांनी आज हा चित्रपट पाहून ठरवावे. गब्बरचे हाल करणाऱ्या जय-वीरू पैकी मी एक आहे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.

महंत रामगिरी यांच्याविरोधात देशभरात 58 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी देशभरात आंदोलने, निदर्शने झाली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः सांगतात की त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. महाराष्ट्रातील पोलिस हे आता पोलिस राहिलेले नाहीत, तर ते आएसएस आणि भाजपचे कार्यकर्ते खाकी घालून बसले असे वाटत आहेत. पोलिस खात्यात भरती होतांना घेतलेल्या शपथेचा त्यांना विसर पडला आहे.

जिथे मुख्यमंत्री रामगिरी महाराजाच्या बाजूने उभे राहतात, तिथे पोलिसांकडून तरी कारवाईची अपेक्षा कशी करणार? पण आता खूप झाले, रामगिरी, राणे यांच्यावर पाच दिवसात कारवाई करा, नाहीतर आम्ही मुंबईत धडकू. तिरंगा यात्रा घेऊन येऊ, मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देऊन कायद्याची आठवण करून देऊ, पोलिसांना त्यांनी अंगावर खादी चढवताना घेतलेल्या शपथेची आठवण करून देऊ, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT