Ashok Chavan, News, Aurangabad sarkarnama
मराठवाडा

Telangana Election Result 2023 : ''...म्हणून तेलंगणाने 'BRS'ला नाकारलं अन् काँग्रेसला निवडलं '' ; अशोक चव्हाणांचं विधान!

Mayur Ratnaparkhe

लक्ष्मीकांत मुळे -

Telangana Assembly Election : ''तेलंगणातील बीआरएसचे राज्य सरकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी घोषित केलेल्या योजनांवर आणि अवास्तव प्रसिद्धीवर तगले होते. जाहिरातीत भलेही गुलाबी चित्र रंगवले जात होते, मात्र वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.'', असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे.

नांदेड मार्गे राज्यातील राजकारणात शिरकाव करु पाहणाऱ्या बीआएसची सत्ता तेलंगणात संपुष्टात आली आहे. या निवडणूकीत काँग्रेसने मोठा विजय संपादन केला आहे. तेलंगणा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्यावर सीमावर्ती भागातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती.

जबाबदारी पार पाडत पक्षाच्या विजयात अशोक चव्हाणांनी हातभार लावला आहे. या विजयानंतर त्यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली असून बीआरएसवर घणाघाती टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले, ''बीआरएसने शेतकऱ्यांना वर्षाला केवळ १० हजार रुपये देऊन इतर सर्व योजना जवळपास संपुष्टात आणल्या. तेलंगणात मोफत पीककर्ज नव्हते, पीकविमा नव्हता, एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी यंत्रणा नव्हती, खासगी खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण सुरु होते, त्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत होत्या.''

याशिवाय ''सिंचन प्रकल्पांवरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू होता. राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायलाही बीआरएसच्या राज्य सरकारकडे पैसा नव्हता. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि अंदाधुंद पद्धतीने दारू दुकानांचे परवाने वाटून तेथील राज्य सरकार दिवस पुढे ढकलत होते.

रोजगार निर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता. त्यामुळेच तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले.'' असंही अशोक चव्हाणांनी सांगितलं.

तसेच, ''मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गहलोत व छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली, चांगल्या योजना राबवल्या. दोघांचीही प्रतीमा उत्तम होती. या तीन राज्यातील निकालांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विश्षेलण करून उणीवा शोधल्या जातील व दुरुस्तही केल्या जातील.'', असे अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT