Farmers Leader Raju Sheety
Farmers Leader Raju Sheety Sarkarnama
मराठवाडा

मुख्यमंत्र्यांनी फक्त गोड बोलू नये, शेतकऱ्यांना जे द्यायचे असेल ते थेट द्यावे

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद ः गेल्या पाच वर्षात आयकर विभागाने जिथे धाडी टाकल्या त्यातुन काय निष्पन्न झाले याची माहिती द्या, अशी मागणी करतांनाच राजकीय सुडबुद्धीतून केलेल्या या कारवाया असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी यानी केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त गोड बोलतात, तोंडी आधार देतात, जे द्यायचे ते थेट द्या, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यानी राज्यातील प्रमुख शक्तीपीठाच्या ठिकाणी जागर यात्रा आयोजीत केली आहे. ही यात्रा उस्मानाबादेत आल्यानंतर त्यानी पत्रकाराशी संवाद साधला त्यावेळी शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिका केली. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे त्यांनी ऊस परिषदही घेतली.

शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षात आयकर व इतर विभागांनी धाडी टाकल्या, त्याचे पुढे काय झाले? त्यात काय सापडले याची माहिती जनतेला मिळायला हवी. केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत असुन या वापरामुळे या संस्थांबद्दलचा आदर कमी झाला आहे. भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का ? असा सवालही शेट्टी यांनी केला.

धाडी पडतात मात्र त्याच पुढे काही होत नाही, ब्लॅकमेल करण्यासाठी धाडीचा वापर केला जातो याची आता सामान्य जनतेलाही खात्री पटली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कोणीच वाली राहिलेले नाही, केंद्र व राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकार मदत करत नाही तर केंद्राचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी आहे.

मराठवाड्यात पिकांचे नुकसान झाले तरी मदतीच्या नावाने नुसत्या गप्पा मारल्या जात आहेत. केंद्र सरकार व कारखानदार मिळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आखत आहेत, त्याच्या बाजूने कोणीही नाही, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना बळ दे व दुष्टांचा संहार कर यासाठी ही जागर यात्रा असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना ते फक्त गोड बोलून शेतकऱ्यांना तोंडी आधार देण्याच काम करत आहेत. पण शाब्दिक खेळ करून शेतकऱ्यांना फसवु नका, जे द्यायचे असेल ते द्या, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. केंद्र सरकारने सोयाबीनचे दर पाडले शिवाय आता एफआरपीचे तुकडे करुन ऊसउत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे.

विरोधी बाकावर बसले की शेतकऱ्यांचा कळवळा येतो, सत्तेत गेल्यानंतर त्याच्याविरोधात भुमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांना आता शेतकऱ्यांनीच धडा शिकविणे गरजेचे असल्याचे शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT