नांदेड ः लोकसभा निवडणुकीत चाललेली वंचित बहुजन आघाडीची जादू आता ओसरली आहे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितने अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रा. यशपाल भिंगे यांना उभे केले होते. प्रकाश आंबेडकर यांनी भिंगे यांच्यासाठी नांदेडात रेकाॅर्डब्रेक सभा घेत जोरदार वातावरण निर्मिती केली होती. परिणामी भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार अशी विक्रमी मते मिळवली. पण मतांचे हे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडले आणि अशोक चव्हाण यांचा पराभव होऊन प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितने पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. डाॅ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली, त्यांच्या प्रचारासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर, अंजली आंबेडकर देगलूरमध्ये येऊन गेले. वंचित ही भाजपची बी टीम आहे, वंचितच्या गाडीत भाजपचे पेट्रोल आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी लोकसभा आणि त्यानंतरच्या अनेक सभांमधून केला होता.
तो धागा पकडत प्रकाश आंबेडकर यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत अशोक चव्हाण यांना दम भरला होता. आमच्या नादारा लागू नका, नाहीतर आदर्श घोटाळ्याची दबलेली फाईल पुन्हा वर निघेल. तुम्हाला पत्नी, सासूसह जेलमध्ये जावे लागेल. तुमच्या सोबत सुशीलकुमार शिंदेंनाही न्यावे लागेल, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.
त्यांच्या या इशाऱ्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण त्यामुळे अशोक चव्हाण यांचे समर्थक आणि काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र ईरेला पेटले. वंचितमुळे मतांचे विभाजन होऊ नये, त्याचा फटका आपल्या उमेदवाराला बसू नये याची योग्य ती काळजी चव्हाण आणि कंपनीने घेतली. शिवाय आंबेडकरांच्या आदर्श घोटाळ्या संदर्भातील चिथावणीखोर विधानामुळे देखील काॅंग्रेसचे मतदार एकवटल्याचे निकालावरून दिसून आले.
अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत देखील हाच मुद्दा प्रकर्षाने मांडला, की वंचितला मत म्हणजे भाजपला फायदा हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. लोकसभेला झालेली चूक मतदारांनी पुन्हा केली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकरांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत अशोक चव्हाण यांना दिलेल्या धमकीचा परिणाम उलटाच झाला असे म्हणावे लागेल. २०१९ च्या याच मतदारसंघातील निवडणूकीत वंचितच्या रामचंद्र भरांडे यांना मिळालेल्या १२,०५७ मतांपर्यंत यावेळी पक्षाला पोहचता आले नाही. डाॅ.उत्तम इंगोले यांना ११,३४७ मतांवरच समाधान मानावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.