Bjp Leader Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

महाविकास आघाडी सरकारने वैधानिक महामंडळ, मराठवाडा वाॅटरग्रीडचा खून केला..

या सरकारला मराठवाड्याबद्दल अजिबात प्रेम नाही, त्यांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आठवतो. (Devendra Fadanvis)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे दलाली आणि मुंबईच्या मोठ्या मोठ्या इमारतीत हरवलेले सरकार आहे. (Bjp) त्यांना मराठवाडा माहित नाही, येथील लोक, शेतकरी, कष्टकरी मजुर माहित नाही. केवळ भाषणापुरता यांना मराठवाडा आठवतो, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.

आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वाॅटरग्रीड आणली, विकासासाठी कवचकुंडल ठरणारे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ यांनी बंद केले. (Marathwada) वाॅटर ग्रीड, वैधानिक विकास महामंडळाचा या सरकारने खून केला, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे महिला बचत गट,शेतकरी उत्पादक कंपनी व विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलतांना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

फडणवीस म्हणाले, आमचे डाॅ. भागवत कराड केंद्रात अर्थ राज्यमंत्री झाले आणि त्यांनी काही महिन्यातच या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात विविध योजना आणण्याचा सपाटा लावला आहे. पुढील वर्षात ते आणखी किती योजना आणतील हे तुम्ही पहाच. पण राज्याच्या सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारने आमच्या काळातल्या अनेक योजना रद्द करून टाकल्या.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही मराठवाडा वाॅटर ग्रीड आणली. आठ पैकी पाच जिल्ह्यातील कामांचे टेंडर देखील काढले. तीन जिल्ह्याची प्रक्रिया देखील सुरू होती. पण सत्ता बदल झाला आणि या सरकारने मराठवाड्यासाठीची ही योजना एका गावापुरती मर्यादित करून टाकली. खऱ्या अर्थाने या ग्रीडचा सरकारने खून केला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला आणण्याची योजना देखील या सरकारने रोखून ठेवली. १६७ टीएमसी पाणी आणण्याचा हा प्रकल्प मार्गी लागला असता तर मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. हीच स्थिती मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन केलल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या कवचकुंडलांची केली. ही महामंडळे बंद केली, त्याला निधी दिला नाही, याची देखील या सरकारने हत्या केली.

त्यामुळे या सरकारला मराठवाड्याबद्दल अजिबात प्रेम नाही, त्यांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आठवतो, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. औरंगाबाद शहरवासियांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मी मुख्यमंत्री असतांना १६८० कोटींची पाण्याची योजना दिली. ती देखील या सरकारने रद्द केली. या योजनेसाठी राज्य सरकारने सगळा पैसा दिला, पण आता १६८० कोटींची ही योजना देखील त्यांनी सहाशे कोटींची करून टाकली.

आमच्या सत्ता काळात पाच वर्षात कधी एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन आम्ही कट केले नाही. पण या सरकारने सर्रास शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केली. स्वतःची वीज बील सरकारच्या तिजोरीतून भरायची आणि सर्वसमान्य शेतकऱ्यांना मात्र बील भरले नाही, म्हणून त्यांचा वीजपुरवठा खंडीत करायचा ही शरमेची बाब असल्याचेही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT