Mumbai News : बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात 'मकोका'तील आरोपी वाल्मिक कराड याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. पोलिस अधिकारी अन् कर्मचारी यांच्याशी त्याची असलेल्या जवळीचे अनेक किस्से सांगितले जात असताना, काही ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशाच एका ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराड याने नाशिकच्या एका युवकाच्या सांगण्यावरून महिला पोलिस उपनिरीक्षकाला केलेल्या फोनचं ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. संवादाच्या शेवटी वाल्मिक कराड युवकाला म्हणतो, 'इग्नोर करायचं, मनावर घ्यायचं नाही, इथं बाप बसलोय आपण, काय घाबरायचं?'
आका वाल्मिक कराड अटक झाल्यापासून त्याचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. पोलिस दलातील त्याच्या नेटवर्कवर देखील चर्चा होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड याचे बीड पोलिस दलातील नेटवर्कवर अनेकदा आवाज उठवला आहे. त्यासंदर्भात तक्रारी देखील केल्या आहेत.
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्या जवळील 26 पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादीच जाहीर केली. यावर आमदार सुरेश धस यांनी ही यादी 150च्या पुढे जाते, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे. यासंदर्भात सुरेश धस यांना आपण पोलिस अधीक्षकांना भेटणार असे सांगितले होते. यानंतर मात्र पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाल्मिक कराड कसा झुकवतो, याचे किस्से समोर येऊ लागले आहेत. तसेच काही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत.
नाशिकच्या एका युवकाने वाल्मिक कराड याला बीड सायबर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक वारंवार फोन करत असल्याचे सांगितल्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग चांगलेच व्हायरल झाले आहे. नाशिक या युवकाने वाल्मिक कराड याला फोन करून बीड सायबर पोलिस ठाण्यात फोन येत आहे, अशी तक्रार केली. यानतर वाल्मिक कराड याने कोणाचा फोन येतो, नाव आणि नंबर पाठव, असे सांगितले. त्या युवकाने लगेच नंबर पाठवला. वाल्मिक कराड याने युवकाचा फोन चालून ठेवत लगेच पोलिसाला फोन लावला.
वाल्मिक कराड याचा फोन जाताच, समोर महिला उपनिरीक्षक फोन उचलते. ती महिला पोलिस अधिकारी वाल्मिक कराड याला, आदराने अण्णा, अशीच हाक मारते. वाल्मिक कराड हा महिला पोलिस अधिकाऱ्याला ताई ही मुलं नाशिक आहेत. इकडं काय येणार? त्यांना फोन करू नका? असे म्हटतो. त्यावर महिला पोलिस अधिकारी आम्ही सर्वांनाच फोन लावतोय. ती पोस्ट डिलिट करायला सांगा. फोन जाणार नाही, असे सांगते. त्यावर कराड म्हणतो, सुरवात त्यांनीच केली. आरे ला का रे, तर म्हणणारच, असे म्हणतो.आणि पोलिस अधिकाऱ्यासोबतचा संवाद थांबतो.
काॅलवर वेटिंग असलेल्या युवकाला वाल्मिक कराड म्हणतो, 'इग्नोर करायचं , एवढं काही मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलोय, आपण. घाबरायच कशाला?', असे म्हणतो आणि संवाद संपतो. वाल्मिक कराड पुढे पोलिस झुकतात, असे अनेकदा समोर आलं आहे. यापूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने वाल्मिक कराड याचे आशीर्वाद घेताना समोर आलं आहे. बीड जिल्हा पोलिस दलात नेमकं कोण चालवतं हा प्रश्नच यामुळे उपस्थित राहतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.