औरंगाबाद ः शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली उद्या शहरात शिवसेनेचे आक्रोश मोर्चा निघणार आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या आकाशाला भिडलेल्या किंमती या विरोधात जनतेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जाते. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महागाईच्या विरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? पाणी पुरवठा योजना कधी पुर्ण होणार, औरंगाबादचे संभाजीनगर कधी करून दाखवणार? असे सवाल केले आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या आक्रोश मोर्चावर टीका केली.
दाशरथे म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण यांना अजूनही शहरवासियांना चोवीस तास पाणी देता आले नाही. राज्यातील कुठल्याही मोठ्या शहरापेक्षा इथे पाणीपट्टी जास्त आहे. पाणी पट्टी ३६५ दिवसांची आणि पाणी मात्र फक्त ६० दिवस, मग या अन्यायावर कोण बोलणार?
शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने दोनशे-अडीशे कोटी दिले, तरी रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. शहरांतर्गत टोल नाके कुणाच्या हितासाठी सुरू आहेत? याचे उत्तर देखील शिवसेनेच्या नेत्यांनी द्यावे, असे आवानह दाशरथे यांनी केले. पेट्रोल-डिझेलच्या करात केंद्रातील सरकारने कपात केली, देशातील इतर राज्यांनी देखील आपला कर कमी करून आपल्या जनतेला दिलासा दिला. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार एक रुपयांचा कर कमी करायला तयार नाही.
शेतकऱ्यांची अवस्था देखील तशीच आहे. पीक विम्याची रक्कम केंद्रातील सरकारने भरली, पण राज्याने अद्याप आपला वाटा भरला नाही, त्यामुळे अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसून देखील राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकलेला नाही, याला जबादार कोण?
हे देखील मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पहावे, असा टोला देखील मनसेने संजय राऊत यांना लगावला. आपल ठेवाव झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून अशी शिवसेनेची गत झाली असून आम्ही त्यांचा निषेध करतो, असेही दाशरथे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.