Politics : औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शेलुद या ग्रामपंचायतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत चक्क या ग्रामपंचायतीचाच लिलाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकाराची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
सिल्लोड तालुक्यातील शेलुद गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे तब्बल लाखात विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये लाखो रुपयांची बोली लावून ही सर्व पदे विकली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
यामध्ये सरपंचपद हे 14 लाख 50 हजार रुपये, तसेच उपसरपंच पद हे 4 लाख रुपये आणि सदस्य पदासाठी तब्बल 70 हजारांपासून ते थेट दोन लाखापर्यंत बोली लागली असल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. तसेच याबरोबरच गावकऱ्यांकडून देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गावातील एका मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर मात्र, ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्याचा बनाव रचण्यात आला असल्याचा प्रकार आता समोर आला आहे.
या गावचे सरपंचपद हे एका महिलेकडे आहे. मात्र, हे सर्व आरोप सरपंचपदी असणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीने फेटाळले आहेत. तसेच असा कोणता लिलावच झाला नसल्याचे सांगितलं आहे.
दरम्यान, हा सर्व लिलाव न पटल्यामुळे या लिलावातीलच एकाने हा सर्व प्रकार उजेडात आणला असल्याचे बोलले जात आहे. तसेच याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.