Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : तर चक्की पिसिंग अॅन्ड पिसिंग.. अजित पवारांना का झाली आठवण ?

Jagdish Pansare

Ajit Pawar In Marathwada News : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील महायुती सरकार विरोधातला रोष वाढतो आहे. सर्वसामान्य जनतेसह विरोधी पक्षांनी बदलापूरसह देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. त्यानंतर सरकार म्हणून महिला सुरक्षेसाठी काय उपयायोजना केल्या जात आहेत? हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या जन सन्मान यात्रेतून सांगत आहेत.

लातूर जिल्ह्यातील कार्यक्रमात केलेल्या भाषणात (Ajit Pawar) अजित पवार यांनी महिला अत्याचाराची तक्रार आल्यानंतर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना `चक्की पिसिंग अॅन्ड पिसिंग` करायला पाठवणार, असा इशारा दिला. विशेष म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना जेल मध्ये टाकून ` चक्की पिसिंग अॅन्ड पिसिंग` करायला पाठवणार, असे फडणवीस जाहीर भाषणातून सांगायचे.

आता अजित पवार महायुती सरकारमध्ये असून राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देखील आहेत. महायुती सरकारच्या कामाची माहिती देताना अजित पवार यांनी आज फडणवीसांच्या त्याच `चक्की पिसिंग` डायलाॅगचा खुबीने वापर करून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राज्यात जन सन्मान यात्रा काढली जात आहे. आज या निमित्ताने मराठवाड्यात आलेल्या अजित पवार यांनी आपल्या भाषणातून महिला सुरक्षा विषयावर जोर देत सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

महिलांवर कुठलाही वाईट प्रसंग ओढावला तर त्यांनी न घाबरता याची तक्रार पोलिसात द्यावी, त्यानंतर जर कोणी कारवाईत कचुराई केली, तर त्या अधिकाऱ्यांना चक्की पिसिंग अॅन्ड पिसिंगला पाठवणारच, असे पवारांनी ठणकावून सांगितले. (NCP) या शिवाय राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबद्दल आपण राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागतो, असे म्हणत जाहीर माफी मागितली.

शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणे हे आपल्या सर्वांना धक्का देणारे आहे. कुणी केले, काय केले, त्याचा तपास लावला पाहिजे. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कोणीही असू द्या कठोर कारवाई झाली पाहिजे. पुतळा बनवणाऱ्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT