औरंगाबाद : गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेसाठी गाजावाजा करत १५० चे टार्गेट दिले आहे. पण (Shivsena) शिवसेनेचे प्लानिंग आधीच झाले आहे, मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांतपणे याची नियोजनबद्ध तयारी केली आहे, तुमच्या सारखा आरडाओरडा केला नाही, अशा शब्दात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी अमित शहा यांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) शिवसेनेला जमीनीवर आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या नेत्यांनाच खरतरं जमीनीवर आणण्याची गरज असल्याची टीका देखील खैरे यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौऱ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज अमित शहा यांनी लालबागच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोजक्या दोनशे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी शहा यांनी उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवून मुंबईवर भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे, असे सांगत मुंबई महापालिकेसाठी १५० जागांचे लक्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा केल्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया आता उमटायला लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्या विधानाचा समाचार घेतांना तुम्हालाच जमीनीवर आणण्याची गरज असल्याचा टोला लगावला.
खैरे म्हणाले, शिवसेना ही जमीनीवरच आहे, उलट तुम्हाला जे नेहमी हवेत म्हणजे विमानात आणि हेलिकाॅप्टरमध्ये फिरतात त्यांनाच जमीनीवर आणण्याची गरज आहे. मुंबई ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाची आहे. त्यामुळे भाजपने कितीही दावे केले तरी मुंबई महापालिकेवर भगवाच फडकणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत १५१ जागा निवडून आणण्यासाठीचे प्लानिंग केले आहे. शातंपणे त्यांचे काम सुरू आहे, भाजपसारखा आकांडतांडव ते करत नाहीत.
हिंदुत्ववादी पक्षाला बदनाम करण्याचे पाप अमित शहा हे करत आहेत. ते आणि मी दोघेही हनुमान भक्त आहोत, आम्ही एकत्रित मारोतीचे दर्शन घेतले आहे, त्यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचे पाप करू नये, असे आवाहन देखील खैरे यांनी केले. भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांना पैशाच्या जोरावर त्रास देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. कोट्यावधी रुपये देऊन आमदार खरेदी केले जात आहेत, असा आरोप देखील खैरेंनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.