औरंगाबाद ः `हाऊ मच` या दोन इंग्रजी शब्दावर आपण जगातले बारा देश फिरून आलो, असे सांगणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खात्यातील एका इंग्रजीत बोलणाऱ्या अधिकाऱ्याची चांगलीच जिरवली. या संदर्भातला किस्सा दानवे यांनी `सरकारनामा`ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितला.
रावसाहेब दानवे खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर अनेक परदेश दौरे केले. इंग्रजी बोलता येत नसतांना देखील त्यांनी हे दौरे कसे केले? याचे अनेक रंजक किस्से स्वतः दानवे यांनीच जाहीर सभा, मेळावे, कार्यक्रमातून सांगितले आहेत. आजही त्याची चर्चा राजकारणात चवीने केली जाते.
मोदी मंत्रीमंडळ विस्तारात खातेबदल होऊन दानवे यांच्याकडे रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचा महत्वाचा कारभार सोपवण्यात आला. या विभागातील उच्चपदस्थ अधिकारी सातत्याने इंग्रीज संभाषण करतात, मग तुम्ही त्यांच्याशी कसं जुळवून घेता? असा प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला.
यावर दानवे म्हणाले, माझा आणि इंग्रजीचा संबंध एकविसाव्या वर्षी म्हणजेच काॅलेजमध्ये गेलो तेव्हा आला. माझ्या वडिलांनी मला कधी इंग्रजी शाळेत पाठवलेच नाही, तर तुम्ही माझ्याकडून इंग्रजीत बोलण्याची अपेक्षा कशी करू शकता? मी जेव्हा रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्राल्याचा राज्यमंत्री म्हणून पदभार घेतला तेव्हा एक अधिकारी माझ्याशी इंग्रजीत बोलू लागला.
मी त्याला म्हणालो, इंग्रजीत बोलू नका हिंदीत बोला, पण तो काहीकेल्या थांबायला तयार नाही. त्याचं आपल इंग्रजीतून बोलणं सुरूच होत. मग मी त्याच्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली. मग तो अधिकारी गांगरला, मला तुमची भाषा समजत नाही म्हणायला लागला. मग मी त्याला म्हणालो, तुला जर माझी भाषा समजत नाही, तर तुझी मला कशी समजेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी इंग्रीज बोलत नाहीत, अटलबिहारी वाजपेयी इंग्रजीत कधी बोलले नाही. मग दोघांना समजणाऱ्या हिंदी या राष्ट्रीय भाषेत तुम्ही का बोलत नाही? मग कुठे तो अधिकारी इंग्रजी सोडून हिंदीतून बोलायला लागला. काम करतांना भाषेची अडचण कधी येत नाही, राजकारणात शिक्षणापेक्षा अनुभव महत्वाचा असतो, असेही दानवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.