Marathwada : बीड जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांवर (Beed APMC Election) महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. या निकालांकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे पाहिले जाते. जिल्ह्यातील सहापैकी फक्त केज बाजार समितीवर भाजपला सत्ता राखता आली. उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. परंतु हा निकाल आपल्यासाठी धक्कादायक नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पुर्वी ज्यांची जिथे सत्ता होती, त्यांची सत्ता पुन्हा कायम राहिली. परळीचे म्हणाल तर तिथे आमची सत्ता नव्हती, तिथे पुन्हा त्यांची सत्ता आली. आम्ही तिथे लढूच नये असे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आले होते. पण विरोधकांना बुथवर बसून राहावे लागले यातच सगळं आलं, अशा शब्दात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्यावर देखील निशाणा साधला.
बीड जिल्ह्यातील (Beed News) सहा पैकी पाच बाजार समित्यांमध्ये भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना चमकदार कामगिरी करता आली नाही, उलट वडवणी, गेवराई, बीड, परळी, अंबाजोगाई या ठिकाणी महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे अर्थात याचे श्रेय व पराभवाचा फटका कुणाला बसणार याची चर्चा जिल्ह्यात व राज्यात देखील सुरू आहे.
परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा यांचा पराभव झाला, तेव्हापासून परळीसह जिल्ह्यात कुठलीही छोटी-मोठी निवडणूक झाली की त्याच्या जय-पराजयाचे विश्लेषण करून दोघांपैकी एकाला दोषी ठरवले जाते. बाजार समितीच्या निकालानंतर देखील तेच घडतांना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देतांना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील केज मध्ये जैसे थेच परिस्थिती आहे. बीडमध्ये सगळे मिळून पॅनल केले होते त्यात आमचा ही उमेदवार निवडून आला आहे. परळीत आम्ही लढूच नये अशी विरोधकांची परिस्थिती होती, मार्केट कमिटी त्यांच्याकडेच होती. पुन्हा त्यांनी बाजी मारली त्यांचे अभिनंदन करते. मार्केट कमिटी ही कोणत्याही एका पक्षाची नसते. बीड तालुका वगळता मार्केट कमिट्यांमधील परिस्थिती जशास तशीच आहे. त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक नाही.
आम्हाला आमची मते वाढविता आली, विरोधकांना या निवडणुकीत बूथ वर बसून राहावे लागले, असा टोला देखील त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. केज आणि आष्टीत आमची सत्ता कायम राहिली, त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्याकडेच ती राहिली. कोणतीही निवडणूक ही सत्ताधारी आणि विरोधकांसाठी धडा देणारी असते. पुढील निवडणुका कशा जातील हे माहीत, ते आत्ताच सांगता येणार नाही.
मात्र आमचा कार्यकर्ता निवडणूक लढला एवढे मात्र निश्चित. मी धनंजय यांचं ही अभिनंदन करते, तसेच भाजपसह इतर पक्षांनी अंतर्मुख झालं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगते आधी ज्याची सत्ता ज्या बाजार समितीमध्ये होती, तिथं त्यांचीच सत्ता पुन्हा आली आहे. त्यामुळे इथे कोणाचाही पराभव झाला नाही, याचा पुनरुच्चार देखील पंकजा यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.