Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

राष्ट्रवादीचे दोन मंत्री आधीच जेलमध्ये, तिथेही युती हवी, म्हणून संजय राऊत गेले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : उठसूठ जे रोज आम्हाला गद्दार म्हणतात, त्यांचे फोटो लावून आम्ही बसायचे का ? बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत, आम्ही बंड केलेले नाही तर काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सोबत नको म्हणून उठाव केला होता. पण तरीही आम्हाला गद्दार ठरवले जात असले तर आम्ही फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच फोटो लावू. आमच्या मनात आणि कार्यालयात देखील ते कायम राहतील, अशा शब्दात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे दोन मंत्री आधीच जेलमध्ये आहेत, तिथेही युती असावी म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) गेले, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

(Shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदार, मंत्र्यांचा वारंवार गद्दार असा उल्लेख केला जातो. त्यामुळे बंडखोर आमदार चांगेलच संतापले आहेत. आधी ठाकरे कुटुंबाबद्दल बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, परंतु आता तीही त्यांनी गुंडाळून ठेवली आहे. ठाकरेंकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला जशासस तसे उत्तर दिले जात आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यात आघाडीवर आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय शिरसाट यांनी संजय राऊत, विनायक राऊत यांच्यावर देखील भाष्य केले. शिरसाट म्हणाले, ज्या दिवसापासुन आम्ही उठाव केला तेव्हापासून आम्ही सांगतो आहोत की हा उठाव काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होता. पण आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून हिणवले जात आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे जर वारंवार गद्दार म्हणत असतील तर त्यांचे फोटो लावून आम्ही बसू शकत नाही. जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही कदापी लावणार नाही, शिवसेना प्रमुखांचा फोटो कायम राहील, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात खासदार विनायक राऊत यांनी देखील बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली, त्यालाही शिरसाट यांनी उत्तर दिले. विनायक राऊत यांना आउट गोइंग माहीत नाही, त्यांना फक्त पैसे खायचे माहिती आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यांवर अडणीपणाची टीका करत आहेत. एसी कॅबिनमध्ये बसून तुम्ही सर्व ठरवा, पण राज्याचा मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करत असतांना तुम्ही त्यांना अडाणी म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव वाटते.

शिवसेना फोडण्यात संजय राऊत याचा मोठा वाटा आहे याचा पुनरुच्चार करतांना शिरसाट यांनी राऊतांवर राष्ट्रवादीची सुपारी घेऊन काम केल्याचा आरोप केला. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जसे राऊतांच्या कुटुंबियांना भेटायला गेले तसेच यशवंत जाधव, अडसूळ, प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील त्यांनी जायला हवे होते. पण बहुदा संजय राऊत आता दोन-चार वर्षे बाहेर येणार नाही याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटत असेल म्हणून ते राऊतांच्या घरी गेले असावेत, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला.

दोन मंत्री जेलमध्ये आहेत त्यांच्याशी बोलायला संजय राऊत नको का? जेलमध्ये युती नको का व्हायला, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. दिल्लीवाऱ्या करण्यापेक्षा लोकांना मदत देण्याचा मोठेपणा दाखवा, मंत्रीमंडळाचा विस्तार करा, या अजित पवारांच्या टीकेवर अजित पवारांना दिल्लीचा अनुभव जास्त आहे, म्हणून ते असे बोलत असावे. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली ही आनंदाची बाब आहे, त्यामुळे आता कामे वेगाने होतील, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT