Uddhav Thackeray Dharashiv Rally : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी केल्यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या धाराशिव मतदारसंघात आज दुपारी साडेतीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची सभा होत आहे.
मात्र या सभेपूर्वीच खासदार ओम राजेनिंबाळकर हे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शनिदर्शनासाठी गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘निष्ठेची वज्रमूठ’ अभियान सुरू केले असून, संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. याच मोहिमेअंतर्गत आज धाराशिवमध्ये होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण बंडखोर खासदारांमध्ये ओम राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जात होते.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची सभा सुरू होण्याच्या काही तास आधीच ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत शनिशिंगणापूर इथं येत शनिदर्शन घेतले. विशेष म्हणजे त्याआधी त्यांनी तिरुपती बालाजी येथेही दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे पोहोचल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या तिन्ही नेत्यांनी शनिमूर्तीला तेल अर्पण केले, निळे वस्त्र परिधान केले आणि विधिवत पूजा केली. आमदार विठ्ठल लंघे आणि देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा काढून लोकांना जोडत आहोत. त्यामुळे पक्ष दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. हतबल झालेला ठाकरे गट आता सहा मतदारसंघात जाऊन शिव्याशाप देत असला, तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निशाणा साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून सत्ता भोगणाऱ्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळिमा फासला. आम्ही देवदर्शनासाठी केंद्रीय मंत्रिपद मागायला आलो नाही, तर पक्ष अधिक बळकट व्हावा यासाठी आलो आहोत.
आता एकीकडे उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळाव्यातून बंडखोर खासदारांचा समाचार घेणार आहेत, तर दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर यांचे श्रीकांत शिंदेंसोबतचे शनिदर्शन, या दोन घटनांच्या टायमिंगने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.