Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : ठाकरेंची तोफ मराठवाड्यात धडाडणार; शिंदेंचे मंत्री, आमदार रडारवर

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar Politics News :

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकणातील जनसंवाद दौरा गाजत असतानाच आता ते मराठवाड्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 तारखेला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गंगापूर, खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी Uddhav Thackeray संवाद साधणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात याच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार शिंदेंच्या गोटात सामील झाले होते. या सगळ्या आमदारांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील या मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाने प्रबोधन यात्रा, शिवसंवाद, होऊ दे चर्चा, जनाधिकार अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मेळावे, सभा घेत हल्ला चढवला होता.

मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांना नुकताच शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. तर याआधी वैजापूरमध्ये माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या रुपाने ठाकरे गटाने पक्ष सोडून गेलेल्या विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरणारे यांचा बंदोबस्त केला. आता शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य आणि ग्रामीणच्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गट त्यांच्यापुढे कसे आव्हान उभे करतात यावर येणारी लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक कशी होणार हे स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंच्या जिल्हा दौऱ्यातून फक्त छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ व त्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावरच लक्ष्य केंद्रीत केले जात आहे. सिल्लोड-सोयगाव या अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघाचा 12 रोजीच्या दौऱ्यात समावेश नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड हे स्थानिक नेतेही ठाकरेंच्या जनसंवाद दौऱ्यात सोबत असणार आहेत.

सोमवारी, 12 रोजी सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे शहरात दाखल होणार आहेत. दुपारी 12 वाजता गंगापूर, 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे ते जनतेशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत. एकाच दिवसांच्या या जिल्हा दौऱ्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात? लोकसभा उमेदवारी संदर्भात काही भाष्य करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT