Nitin Gadkari Sarkarnama
मराठवाडा

Nitin Gadkari: गडकरीसाहेबांच्या विकासाच्या 'व्हिजन'ला दृष्ट लावताहेत हे खड्डे

Solapur Umarga road work Minister Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात महामार्गांचे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या कामाचे नेहमी कौतुक होते, मात्र सोलापूर ते उमरगा शहराच्या पुढे कर्नाटक सीमेपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

अय्यूब कादरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे, महामार्गांच्या उभारणीबाबत त्यांच्या दृष्टीकोणाचे नेहमीच कौतुक होते. काही नेते, वरिष्ठ अधिकारी तर खासगीत बोलताना गडकरी हे मोदी सरकारमधील एकमेव 'परफॉर्मर' आहेत, असे सांगतात. राज्यात युती सरकारमध्ये मंत्री असतानाही गडकरी यांनी अनेक उड्डाणपुलांची उभारणी केली होती. त्यामुळे त्यांना प्रेमाने 'रोडकरी' असेही म्हटले जाते.

मात्र दोन महामार्ग असे आहे, ज्यामुळे गडकरीसाहेबांच्या इतक्या मोठ्या कामाला दृष्ट लागून जाते. त्यापेकी एक मुंबई-गोवा महामार्ग आणि दुसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चा काही भाग. हा महामार्ग पुण्यातून सुरू होतो आणि कर्नाटक, तेलंगणामार्गे आंध्र प्रदेशातील मच्छलीपटणम येथे संपतो. पुण्यासह सोलापूर, हैदराबाद, सूर्यापेट, विजयवाडा ही मोठी शहरे, महानगरे या महामार्गावर आहेत.

सोलापूर ते उमरगा (जि. धाराशिव) शहराच्या पुढे कर्नाटक सीमेपर्यंत या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ती आज, कालची नाही, तर गेल्या 10-11 वर्षांपासूनची आहे. वाहनांची गती मंदावली, वाहने खड्ड्यातून जायला सुरुवात झाली की आपण धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत आलोय, याची जाणीव प्रवाशांना आपोआप होते.

तुळजापूर तालुक्यातील अणदूरपासून उमरगादरम्यान अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे रखडलेली आहेत. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. नळदुर्ग शहराजवळील बायपास रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण झालेले नाही.

पावसाळ्यात वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पाणी साचत असल्याने खड्डे असल्याचे चालकांच्या लक्षात येत नाही. अशाच प्रकारातून या महामार्गावर ठिकठिकाणी वाहने नादुरुस्त होण्याचे, टायर पंक्चर होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेक गावांना अंडरपास, ओव्हरपास नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा जीव मुठीत, ही समस्या आणखी वेगळीच आहे.

सोलापूरपासून उमरग्याच्या पुढे कर्नाटक सीमेपर्यंतच्या या रस्त्याचे अंदाजपत्रक 2011-2012 मध्ये झाले होते. रस्त्याचे डिझाइन चुकले आहे, असे सांगितले जाते. भूसंपादनातही काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. गरज 100 एकरांची असेल तर जमीन मात्र 120 एकर वगैरे लागली आहे. जमिनीच्या मोजणीसाठी तज्ज्ञांएेवजी सेवानिवृत्त, प्रशिक्षित नसलेल्या, साखळीने जमीन मोजण्याच्या काळातील लोक नेमण्यात आले होते, असे सांगितले जाते.

प्रत्यक्षात जमिनीची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात आली. त्यामुळे भूसंपादनाचे अंदाज चुकले, शेतकऱ्यांना मोबदला देतानाही चुका झाल्या. काही ठिकाणी बायपासवरील पुलावरून गावांना जोडणारे रस्ते गेले आहेत. त्या पुलाच्या खालून उसाची ट्रक, बस जायला हवी, मात्र तसे झालेले नाही. त्याखाली साचणाऱ्या पाण्याला वाट कशी आणि कठून द्यायची, हे कोडे अद्याप सुटलेले नाही. उमरगा बायपासवर असे उदाहारण पाहायला मिळते.

सोलापूर-उमरगादरम्यानच्या महामार्गाचे काम करणारी कंपनी खरेतर कर्जपुरवठा करणारी होती, असे सांगितले जाते. महामार्गाची कामे करणाऱ्या कंपन्यांना, कंत्राटदारांना ही कंपनी कर्जपुरवठा करते. आपण इतका कर्जपुरवठा करत आहोत, तर एक कामही करून पाहू, या भूमिकेतून संबंधित कंपनीने हे काम घेतले आणि खरा घोळ इथेच झाला. कर्जाला शासनाची हमी असते, त्यामुळे कंत्राटदारही बदलता येत नाही, असे सांगितले जाते.

महामार्गावर पडलेले खड्डे बुजवणार कोण, याबाबतही अडचणच आहे. टोलवसुली शासनाकडून सुरू आहे आणि खड्डे बुजवण्याचे काम कंपनीला सांगितले जाते, अशी अडचण असल्याची चर्चा आहे. या रस्त्याचा लाएबिलीटी पीरियड संपल्यानंतर नवीनच प्रकल्प मंजूर करून घ्यावा लागेल. तरच काम व्यवस्थित होऊ शकते.

या महामार्गाचे काम लवकर व्हावे, यासाठी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नितीन गडकरी यांची भेटही घेतली. आमदार चौगुले यांनी या महामार्गाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले होते, मात्र काम संथगतीनेच सुरू आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT