Beed Nagar Parishad 
मराठवाडा

Beed News: बीड नगरपरिषदेच्या 'जीबी'मध्ये पुन्हा राडा! सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भाजपनं उचललं मोठं पाऊल

BJP-NCP Politics: बीड नगर परिषदेचा कारभार काही केल्या सुधारतांना दिसत नाही. लोकांनी मोठ्या आशेने सत्तांतर केलं, दिवगंत नेते अजित पवार यांच्या बारामती, पिंपरी-चिंडवड पॅटर्न प्रमाणे विकासाच्या आश्वासनाला प्रतिसाद दिला.

Jagdish Pansare

BJP-NCP Politics: बीड नगर परिषदेचा कारभार काही केल्या सुधारतांना दिसत नाही. लोकांनी मोठ्या आशेने सत्तांतर केले. दिवगंत नेते अजित पवार यांच्या बारामती, पिंपरी-चिंडवड पॅटर्न प्रमाणे विकासाच्या आश्वासनाला प्रतिसाद दिला. पण अजित पवारांनी बीडकरांना दाखवलेल्या या स्वप्नांचा त्यांच्या पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना मात्र विसर पडलल्याचे बोलले जाते. आठ महिन्यात ठोस कामे नाही, नगर परिषदेच्या सर्वसाधरण सभांमध्ये कमालीचा गोंधळ, पक्षांतर्गत राजकारण आणि विरोधकांची गळचेपी असे आरोप सातत्याने केले गेले. आज पुन्हा तोच कित्ता गिरवण्यात आला.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच तक्रार केली. दुष्काळाच्या भयानक छायेत होरपळणाऱ्या बीड शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी बोलावलेली नगर परिषदेची सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा नागरीकांचे प्रश्न दुय्यम आणि सत्ताधारी-विरोधकांचे राजकारण उजवे ठरले.

नागरी सुविधांच्या आढाव्यासाठी आणि दुष्काळी उपायांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेले हे सभागृह पाहून नगर परिषदेची सर्वसाधारण सभा की गावचा बाजार? असा संतप्त सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे. मूळ विषय सोडून मनमानी पद्धतीने विषय रेटून नेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतापामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. या राड्यात महिला लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप करत भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

सभेच्या कामकाजादरम्यान भाजप नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. स्थायी समितीच्या विषयांवर सभागृहाची रीतसर मंजुरी न घेताच पुढचे विषय पटलावर आणण्याचा पायंडा सत्ताधाऱ्यांनी पाडला आहे. पहिला विषय पूर्ण निकाली निघालेला नसताना थेट तिसऱ्या आणि चौथ्या विषयावर चर्चा ढकलून विषय रेटून नेण्याचा डाव रचल्याचा आरोप विरोधकांनी केला. घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड, स्लॉटर हाऊसची रखडलेली कामे आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब यावर जाब विचारणाऱ्या नगरसेविकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला गेला.

​या वादात भर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनीही सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सभागृहात सत्ताधाऱ्यांइतकाच विरोधी पक्षही ताकदीचा आहे. जोपर्यंत सुरुवातीचे विषय स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत पुढील विषय घेऊ दिले जाणार नाहीत. ज्यांना विषय रेटून नेण्याची घाईगडबड असेल त्यांनी सभागृह सोडून बाहेर जावे असा दमच त्यांनी भरला. या खडाजंगीमुळे सभागृहाचा ताण कमालीचा वाढला होता.

​या संपूर्ण गोंधळात सभागृहात महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जात नसल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला. पालिकेत महिला नगराध्यक्ष विराजमान असताना आणि महिला नगरसेविका जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बोलत असताना त्यांना जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप भाजप व शरद पवार गटाने केला. या मनमानी कारभाराविरोधात भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT