Valmik Karad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात कैद असलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मिळणाऱ्या व्हिआयपी ट्रिटमेंटवर आक्षेप घेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी बीडच्या कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून वाल्मिक कराड आणि त्या साथीदारांना मिळणाऱ्या व्हिआयपी ट्रिटमेंट संदर्भात तक्रार केली. या सगळ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराड याला बीड कारागृहातून नागपूरला हलवा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातून आधी अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व इतर सात आरोपी बीडच्या कारागृहात कैद आहेत. मकोका अंतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल असून बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणावरील खटल्याची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, वाल्मिक व त्याच्या साथीदारांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप अनेकदा झाला. मोबाईलचा वापर, घरचे जेवण, तुरुगांतील कॅन्टीनमधून हजारोंची खरेदी, सहकारी कैद्यावर दहशत आणि हल्ल्याच्या घटना यामुळे वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा, अशी मागणी देखील वेळोवेळी समोर आली होती. खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत हाच मुद्दा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे थेट भेटीत मांडला.
दुसरीकडं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून वाल्मिक अण्णाला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा पुन्हा आरोप केला. या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बीडच्या कारागृहात वाल्मिकला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असून तो जेलमधून जिल्ह्यात टोळ्या चालवत असल्याचा आरोप केला गेला. देशमुख कुटुंबियांकडून या संदर्भात करण्यात आलेले आरोप आणि धनंजय देशमुख यांनी कारागृह अधिक्षकांना दिलेले पत्र यावरून पुन्हा एकदा हे प्रकरण तापले आहे.
वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात राजकीय दबावातून बेकायदेशीररित्या सुविधा पुरवल्या जात आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. वाल्मिक इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधतो. दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा वाल्मिकला पुरवली जाते. बराक क्र. 9 जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा मुद्दाम लावण्यात आलेला नाही, याकडेही देशमुख यांनी कारागृह अधिक्षकांचे लक्ष वेधले. वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार कारागृहातूनच बीडमध्ये बाहेर असलेल्या गुंडाच्या मदतीने दहशत निर्माण करत आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.
धनंजय देशमुख यांच्या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, की सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर याची चौकशी व्हावी. तसेच आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.