Chhatrapati Samhajinagar : मुलींच्या शिक्षणाला हातभार लावावा यासाठी ३ हजार रुपये बक्षीस असलेली मॅरेथॉन अनवाणी धावत जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाई यांना १ लाख रुपयांची मदत जाहीर करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी रमाबाई रणवीर आणि त्यांच्या दोन मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील असलेल्या रमाबाई रणवीर अंबाजोगाईत एका अकादमीत स्वयंपाकाचे काम करतात.
अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'अमृत दौड' मॅरेथॉन स्पर्धेत ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून आणि अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पोर्ट्स शूज किंवा कसलेही प्रशिक्षण नसताना, हातात स्लीपर धरून साडीचा पदर सांभाळत त्यांनी ३ हजारांचे बक्षीस जिंकले.
पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणाचा आणि पोलिसात भरती होण्याच्या स्वप्नाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत विजय मिळवला. त्यांची ही जिद्द पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या या यशाची सर्वत्र चर्चा सुरु असताना आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर रमाबाईंच्या मदतीला आल्या आहेत.
रहाटकर यांनी रमाबाई अशोक रणवीर यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांचे कौतुक करत विचारपूस केली. एवढेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम रमाबाईंना देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
रमाबाई मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे रहाटकर यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशीही संवाद साधत रमाबाई आणि त्यांच्या दोन्ही मुलींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत.
ही रक्कम त्यांच्या संघर्षाची किंवा त्यांच्या कर्तृत्वाची किंमत नाही; त्यांनी मला स्वतःला आणि समाजातील अनेकांना दिलेल्या प्रेरणेप्रती कृतज्ञतेची ही एक छोटीशी पाकळी आहे, अशा भावना विजया रहाटकर यांनी मदतीच्या घोषणेनंतर व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.