Viksit Bharat Sankalp Yatra  sarkarnam
मराठवाडा

Viksit Bharat Sankalp Yatra : इकडे योजनांची भीक अन् दुसरीकडे दरोडा; गावकऱ्यांनी 'संकल्प रथ' परत पाठवला

Datta Deshmukh

Beed : इकडे योजनांची भीक घालायची अन॒ दुसरीकडे रात्रीत दरोडा टाकायचा, असे सरकारचे धोरण आहे. गॅस योजना आणली, आज गॅसच्या किंमती किती, एक लाख रुपयात घरकुल कसे बांधायचे. आमचे संपूर्ण गाव कांदा उत्पादक असून रात्रीत सरकारने निर्यात बंदी लावली आणि ५० रुपये किलो दर असलेला कांदा १० रुपयांवर आला. मग नेमका या यात्रेचा उद्देश काय, अशा ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या भडीमाराने अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडाली आणि ‘आपला संकल्प विकसित भारत’ यात्रेचा रथ गावातून परत गेला. शनिवारी तालुक्यातील मुळूकवाडीत हा प्रकार घडला.

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘आपला संकल्प विकसित भारत’ यात्रा शनिवारी (ता.15) पासून जिल्ह्यात सुरु आहे. २६ जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील विविध गावांत या यात्रेचे रथ (वाहने) गावांमध्ये जाणार आहे. गावांतील चौकांमध्ये सरकारच्या योजनांची चित्रफित दाखविली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूकाही केल्या आहेत.अशाच यात्रेचा रथ शनिवारी मुळूकवाडीत पोचला पण ग्रामस्थांचा रुद्रअवतार पाहून सर्वच अधिकारी चकीत झाले.

बीड पंचायत समितीमध्ये कार्यरत भास्कर भस्मारे, कृषी विभागाचे आनंद वाघ, बचत गटांच्या राख व प्रियंका कागदे अशी सरकारी मंडळी रथ घेऊन मुळूकवाडीच्या चौकात पोचली. या ठिकाणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठींब्यासाठी साखळी उपोषण सुरु आहे. यात्रारथ गावच्या वेशीजवळ आल्यानंतर अगोदर ग्रामस्थांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

सरपंच रामकिसन कदम, उपसरपंच पांडुरंग कानडे, भास्कर ढास, बालासाहेब ढास, प्रविण ढास,खंडु ढास, दादा कदम, वैजनाथ कदम, रघुनाथ ढास, रामहरी ढास, कृष्णा कदम, खंडु कोटुळे, दिलीप ढास, संभाजी भोसले, राजेंद्र ढास, बाळु ढास आदींनी या अधिकाऱ्यांसमोर वरिल प्रश्नांचा भडीमार सुरु केला. भाजप सरकार जातीय तेढ निर्माण करत आहे.

विकास, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काहीच धोरण नाही, दुधाचे भाव काय झाले, असे प्रश्न विचारायला सुरु केले.यावर अधिकाऱ्यांनी या रथातल्या चित्रफितीतून योजनांची माहिती द्यायचीय, यावर एक लाखात घर कसे बांधायचे, एकीकडे योजनांची भीक दिल्यासारखे करायचे आणि दुसरीकडे रात्रीतून दरोडा टाकायचा, असले धोरण आहे असा प्रतिप्रश्न केला. तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा आमच्या गावात यात्रा नको आणि येथून जा असे ग्रामस्थ म्हणाले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यासमोर अधिकाऱ्यांना लावाजमा घेऊन परतावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT