Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घुले कुटुंबियांनी मुंबईत पोलीस महासंचालक सदानंत दाते यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, सीआयडी चौकशी जाहीर होऊनही घुले कुटुंबियांचे समाधान झालेले नाही.
रमेश घुले व त्यांच्या कुटुंबियांनी संशयित आरोपी सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सुरू असलेला संथ तपास आणि खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा रमेश घुले आणि कुटुंबियांनी घेतला आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे उद्यापासून दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर घुले कुटुंबियांचे सुरू झालेले हे उपोषण पोलीस आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील विलास नवनाथ घुले यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृतकाचे भाऊ रमेश नवनाथ घुले यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
21 जून 2026 रोजी विलास घुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन तपासात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून आरोपींना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते रमेश घुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
या निवेदनात मुख्य संशयित आरोपी सौरभ बजरंग सोनवणे व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, खटल्यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि प्रकरण फास्टट्रॅक कोर्ट चालवून मकोका लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही घुले कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.