Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. दोन दिवसापूर्वी पुत्र सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक छळ, फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वकिलामार्फत नोटीस बजावली होती. हे प्रकरण कसेबसे निस्तारत मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित तक्रारदार महिलेला माघार घ्यायला लावली.
या महिलेने हे माझे पर्सनल मॅटर आहे ते मी क्लोज करत आहे, असे म्हणत तक्रार मागे घेतली. यानंतर शिरसाट (Sanjay Shirsat) पिता पुत्रांनी सुटकेचा निश्वास सोडला नाही, तोच छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या व्हिट्स हॉटेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा संजय शिरसाट व त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.
शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागाने व्हिट्स हॉटेल विक्रीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांना फायदा पोहोचवण्याच्या हेतूने बाजार मूल्यापेक्षाही कमी किमती लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यासंदर्भात 25 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात सविस्तर पत्र पाठवून या संपूर्ण लिलावाची आणि खरेदी विक्री प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
सिद्धांत साहित्य खरेदी- विक्री पुरवठादार कंपनीने हे हॉटेल खरेदी केल्याचे दानवे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ही कंपनी मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांची असल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे हॉटेल खरेदी करण्यासाठी संजय शिरसाट यांनी पैसा कुठून आणला? असा सवाल करत पन्नास खोक्यांच्या पैशातून हे हॉटेल खरेदी केले आहे का? असा टोला संजय राऊत यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्हिट्स हॉटेल आहे. रेडीरेकनर नुसार या हॉटेलची किंमत 110 कोटी तर बाजार भाव मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. या संपूर्ण लिलावाला व खरेदी विक्री प्रक्रियेला स्थगिती द्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट संजय शिरसाट यांचे नाव घेत आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुलाने व्यवसाय करणे गैर आहे का?-शिरसाट
दरम्यान, संजय शिरसाट यांनी व्हिट्स हाॅटेल प्रकरणात संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे खोटे आरोप करतात, व्हिट्स हाॅटेल विक्रीसाठी सातव्यांदा लिलाव झाला आहे. कोर्टाच्या आदेशाने हा लिलाव झाला असून ज्या पाच-सहा व्यक्तींनी या लिलावात भाग घेतला त्यापैकी एक माझा मुलगा आहे. 25 टक्के रक्कम लिलावात या पाचजणांनी मिळून भरली आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही बँकेतून कर्ज रुपात मिळणार आहे. ही रक्कम पाच जणांमध्ये विभागाली जाईल आणि दहा वर्षानंतर कर्ज फेड झाल्यानंतर ती खऱ्या अर्थाने या पाच जणांच्या मालकीची होईल.
व्यवसायासाठी जर मराठी माणसाने पाऊल टाकले तर यात गैर काय? एकीकडे मराठी माणूस व्यवसाय करत नाही म्हणायचे, दुसरीकडे मराठा माणसावरच आरोप करायचे? त्यामुळे संजय राऊत यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा करत संजय शिरसाट यांनी सगळे आरोप फेटाळले. माझा मुलगा व्यवसाय करू पाहत आहे.आम्ही कष्टाने कमावतो आहोत, या लिलाव प्रक्रियेवर कोर्टाचे लक्ष आहे. तुम्ही कोर्टात जा, मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आरोपांत काही अर्थ नाही, असेही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.