Chhatrapati Sambhajinagar News : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबाॅल स्टेडिअम उभारण्याच्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या स्वप्नावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्डाने या मैदानावर अचानक खोदकाम सुरू केले असून येथे कार्यालयाच्या इमारती उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मैदानावर खोदकाम सुरू असल्याची माहिती समजताच इम्तियाज जलील यांनी तिकडे धाव घेत हे काम बंद पाडले. कुठल्याही परिस्थितीत इथे वक्फ बोर्डाचे कार्यालय होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
इंदिरा गांधी पासून ते आताच्या राजकीय नेत्यांच्या ऐतिहास सभांचे साक्षीदार असलेले आमखास मैदान फुटबाॅल, क्रिकेट, हाॅकीच्या स्पर्धांसाठीही ओळखले जाते. शहरातील मैदानाची मर्यादित संख्या पाहता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे फुटबाॅल स्टेडिअम उभारण्याचा प्रस्ताव ते खासदार असताना दिला होता. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी या स्टेडियमसाठी सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
अब्दुल सत्तार यांनी या नियोजित स्टेडियमसाठी साडेतीनशे कोटींच्या निधीची तरतूद केल्याचेही बोलले जाते. दरम्यान, इम्तियाज जलील यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपदही गेले. त्यामुळे आता या फुटबाॅल स्टेडियमचा विषय मागे पडला होता. (Waqf Bord) इम्तियाज जलील यांनीही याच मैदानावर किक्रेट स्पर्धा आणि खाद्य महोत्सव आयोजित केला होता. ज्याची चर्चा राज्यभरात झाली होती. परंतु आता इम्तियाज जलील यांच्यासह शहरातील हजारो क्रिडा प्रेमींचे आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबाॅल स्टेडियम उभारण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
वक्फ बोर्डाच्या आखत्यारित हे मैदान असल्यामुळे या ठिकाणी आता बोर्डाच्या कार्यालयासाठी इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी थेट जेसीबी आणून मैदानावर खड्डे खोदण्याचे कामही आजपासून सुरू करण्यात आले. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी मैदानावर धडक देत हे काम बंद पाडले. शहरात वक्फ बोर्डाच्या अनेक जागा असताना आमखास मैदानावरच कार्यालय उभारण्याचा निर्णय कोणी घेतला? बोर्डाच्या इतर जागा तुम्हाला बिल्डरांच्या घशात घालायच्या आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदान उभारण्याचा प्रस्ताव मजूर असताना वक्फ बोर्डाने कसलीच परवानगी न घेता येथे कार्यालय उभारण्यासाठी कामकाज सुरू केले आहे. एकीकडे शहरात वक्फ बोर्डाच्या इतक्या मोठ्या जागा असताना इतर जागेवर कार्यालय न उभारता याच मैदानावर का कार्यालय उभारण्यात येत आहे. कारण, काही ठेकेदारांना हे काम मिळावे यासाठी बोर्डातील सदस्य, चेअरमन यांनी पैसे घेऊन हे काम दिले आहे, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला. वक्फ बोर्डाच्या कार्यालयासाठी मैदानाची एक इंचही जागा देणार नाही, येथे केवळ फुटबाॅल स्टेडियमच उभे राहिल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.