Aimim Mp Imtiaz Jalil
Aimim Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यातून जन्मलेल्या राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या इटालियन आहेत, विदेशी आहेत हा मुद्दा पुढे करत जन्माला आलेल्या राष्ट्रवादी पक्षाने एमआयएमला शिकवू नये. तुमच्या पक्षाचे अस्तित्व किती, कोणत्या राज्यात तुमचे आमदार, खासदार आहेत. काही मंत्रीपद आणि सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही ज्या सोनिया गांधींना नाव ठेवून पक्ष काढला, त्याच सोनियांच्या काॅंग्रेसच्या सोबत गेलात, तेव्हा आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्याआधी एकदा आपल्या अंतरमानात डोकावून पहा, असा टोला एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात एमआयएमचा जन्म हा अल्पसंख्याक समाजाच्या मतांचे विभाजन करून भाजपला सत्तेचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. अल्पसंख्याक समाजाच्या लक्षात आता ही गोष्ट येऊ लागली आहे, त्यामुळे यानंतर एमआयएममधून अनेकजण राज्यभरातून राष्ट्रवादीत प्रेवश करणार असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला होता.

जयंत पाटील यांच्या या टीकेला खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इम्तियाज जलील म्हणाले, जयंतरावांनी एकदा समोरासमोर येऊन डिबेट करावी, मग आम्ही त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. सोनिया गांधी इटालियन आहेत हा मुद्दा उपस्थित करून तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला होता. पण सत्ता आणि मंत्रीपदासाठी आज महाराष्ट्रात तुम्ही त्याच सोनिया गांधींच्या काॅंग्रेस सोबत जाऊन बसलात. तेव्हा एमआयएमला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या पक्षाचा आवाका किती आहे? हे एकदा तपासून बघा.

या उलट एमआयएमचे आमदार तेलंगणा, बिहार, महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये आमच्या पक्षाने निवडणूका लढवून तिथे देखील आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. नजीकच्या काळात उत्तर प्रदेश आणि देशातील अन्य राज्यात देखील तुम्हाला एमआयएमची ताकद दिसेल. पण तुमचा पक्ष शंभर कोटींची वसुली करणारा पक्ष आहे. तेव्हा एमआयएम भाजपची बी टीम आहे की नाही? हे तुम्ही जेव्हा समोरासमोर चर्चेसाठी याल तेव्हा निश्चित सांगू, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT