Dr.Pritam Munde Beed Sarkarnama
मराठवाडा

तुम्ही उन्हात असतांना आम्ही सावलीत बसणार नाही; प्रत्येक संकटात सोबत राहू

(Dasra Melawa Mp Dr.Pritam Munde)अनेकांकडे महागड्या गाड्या, बंगले, बेनामी संपत्ती आहे, पण आमची संपत्ती ही समोर बसलेली,आमच्यावर जीवापाड प्रेम करणारी जनता आहे.

जगदीश पानसरे

सावरगाव घाट ः गेल्या कित्येक तासांपासून तुम्ही उन्हात बसला आहात, आम्हाला कुणी तरी सांगतिले होते की, स्टेजवर सावली करूया, पण मी म्हटंल हा काही आघाडीचा कार्यक्रम नाही. हा मेळावा समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठीचा मेळावा आहे. तुम्हाला उन्हात बसवून आम्ही सावलीत कधीच बसू शकणार नाही, तसे संस्कार आमच्यावर नाहीत. कोरोनाचे संकट असो दी दुष्काळ आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत, इथून पुढे देखील येणाऱ्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबतच राहू, असा विश्वास भाजप खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी सावरगाव घाट येथी भगवान भक्तीगडावरून बोलतांना उपस्थित हजारोंच्या गर्दीला दिला.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान भक्तीगडावर आज दसरा मेळावा झाला. या मेळाव्याचे प्रास्ताविक खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. नियोजीत वेळेपेक्षा मेळाव्याला दोन तास उशीर झाला, तरीही उपस्थितांमधील उत्साह रखरखत्या उन्हात देखील तूसभर देखील कमी झाला नव्हता. हजारोंच्या संख्येने लोक या मेळाव्यासाठी जमले होते.

आपल्या भाषणात याचा उल्लेख करतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या, एवढे कडक ऊन असून देखील गर्दी कायम कशी? असा प्रश्न मला एका चॅनलच्या पत्रकाराने विचारला. तेव्हा मी त्यांना सांगितले हे समजण्यासाठी मुंडेच्या घरात जन्म घ्यावा लागता. आमचे भाग्य थोर म्हणून आम्ही मुंडेच्या घरात जन्मलो. अनेकांकडे महागड्या गाड्या, बंगले, बेनामी संपत्ती आहे, पण आमची संपत्ती ही समोर बसलेली,आमच्यावर जीवापाड प्रेम करणारी जनता आहे.

ही संपत्ती कधीही खर्च होत नाही, कमी होत नाही, की चोरीलाही जात नाही. या संपत्तीचा आम्हाला अभिमान आहे. अनेकांनी या मेळाव्याबद्दल शंका उपस्थित केली होती, याचा उल्लेख करत त्यांनी इथे येऊन ही गर्दी पहावी, असा टोला देखील प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना लगावला. हा दसरा मेळावा म्हणजे जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या विरोधात दुर्गेचे रुप घेऊन त्याचा विनाश करण्याचे प्रतिक असल्याचेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

भाषणाच्या सुरूवातीला समोरच्या गर्दीकडून आवाज येत नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा मंडे टू संडे असे आवाहन करताच समोरून गोपीनाथ मुंडे असा जयघोष झाला. तेव्हा आपला आवाज फक्त बीड जिल्हा, मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंत पोहचला असे म्हणत त्यांनी उन्हात बसलेल्या गर्दींचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT