Mp Imtiaz Jaleel, Aimim

 

Sarkarnama

मराठवाडा

काय निर्बंध घालायचे ते घाला, पण लाॅकडाऊन सहन करणार नाही

गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे केवळ राज्याची नाही तर सर्वसामान्य नागरिक, दररोज कमावून आपला उदर्निवाह चालवणाऱ्या कुटुंबाची मोठी हेळसांड झाली. (Mp Imtiaz Jaleel)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः राज्यात कोरोना, ओमीक्राॅनच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची एका दिवसातील राज्यातील संख्या ११ हजारांवर गेली आहे, तर आजघडीला ओमीक्राॅनचे (Omicron) देखील पाचशेहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. संसर्गाचे वाढते प्रमाण आणि वेग पाहता राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागणार की काय? या बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसत आहे. एमआयएमने (Aimim) मात्र पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय झाला तर तो सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आमचे लाॅकडाऊनला कुठल्याही परिस्थितीत समर्थन असणार नाही, असे स्पष्ट केले आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात व राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. लाखो नागरिकांचे प्राण या संसर्गामुळे गेले. जीवतहानी आणि राज्याची आर्थिकहानी देखील यामुळे मोठ्या प्रमाणात झाली. सर्वसमान्यांचे जगणे कठीण झाल्यामुळे आता पुन्हा लाॅकडाऊन नको, अशीच सर्वांची भावना झाली आहे.

गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे केवळ राज्याची नाही तर सर्वसामान्य नागरिक, दररोज कमावून आपला उदर्निवाह चालवणाऱ्या कुटुंबाची मोठी हेळसांड झाली. सहा महिन्यांपुर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि जनजीवन पुन्हा पुर्वपदावर आले. उद्योग, व्यापार, नोकरदार अशा सगळ्याच वर्गाची गाडी काही प्रमाणात का होईना रुळावर आली. सगळं काही सुरळीत सुरू असतांना आता पुन्हा कोरोना, डेल्टा आणि ओमीक्राॅन व्हायरंटचा प्रभाव वाढू लागला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे, ओमीक्राॅनचा संसर्ग देखील वाढल्याने सरकार आणि आरोग्य विभागासह संपुर्ण प्रशासनासमोर पुन्हा मोठे संकट उभे ठाकले आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व राज्यातील टास्कफोर्सच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.

कुठल्याही परिस्थितीत पुर्वपदावर आलेली परिस्थिती आणि बसलेली आर्थिक घडी पुन्हा विसकटू नये यासाठी प्रयत्न सुरू असले तरी लोकांचे प्राण वाचवणे, कोरोना, ओमीक्राॅनच्या संसर्गापासून प्रत्येक वयोगटाच्या नागरिकांचे संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी देखील सरकारवर आहे.

त्यामुळेच वारंवार काळजी घेण्याचे, गर्दी टाळण्याचे व सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु त्याला मिळणारा प्रतिसाद आणि वाढणारी रुग्ण संख्या पाहता राज्य पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. राजकीय पक्षांनी अद्याप या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी एमआयएमने मात्र लाॅकडाऊनला आपला प्रखर विरोध असेल असे स्पष्ट केले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना कोरोना, ओमीक्राॅनचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, किती बंधने लादायची ती लादा, पण लाॅकडाऊनचे समर्थन अजिबात करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT