Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

माझ्या नावाने बाेंबलून काय उपयोग, मी साधा माणूस; माझ्यावर जेवढे आरोप तेवढा मी मोठा

जगदीश पानसरे

जालना ः माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही, मी साधा माणूस आहे. त्यामुळे कोणाच्या आरोपामुळे मी काही विकासकामे करण्यापासून थांबणार नाही. (Bjp) उलट माझ्यावर झाले की मोठा होतो, तेव्हा मी कालच गणपतीला हात जोडून प्रार्थना केली, की देवा माझ्यावर जेवढे आरोप होतात तेवढा मी मोठा होतो, असे माझ्यावर आरोप होऊ दे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Dnave) यांनी ईडी प्रकरणात शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

चारशे लोकसंख्या असलेल्या गावातला माणूस राज्यात आणि दिल्लीत राज्यमंत्री म्हणून काम करतो, एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते?असा सवालही दानवे यांनी केला. शहरातील विविध विकासकामांच्या उद्धाटन आणि शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खोतकरांचे नाव न घेता उल्लेख केला.

दानवे म्हणाले, मी साधा माणूस आहे, मी कधी कुणावर आरोप केले नाही, करणारही नाही. जर कुणी माझ्यावर आरोप केले तर त्याकडेही मी फारसे लक्ष देत नाही. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप चिकटलेला नाही. जर कुणात हिमंत असेल, आपल्या आईचे दूध पिलेले असेल तर आरोप करून ते सिद्ध करून दाखवावेत.

काही नाहीच तर सिद्ध काय करणार? जे करायचे ते आपल्या हातात होते ते करून घेतले आता, मला फक्त लोकांमध्ये राहयचे आहे. कुणावर चिडायचे नाही, की आरोप करायचे नाही. माझ्यावर कुणी आरोप केले तर त्याला उत्तर द्यायला तुम्ही आहेच, असेही दानवे म्हणाले. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकत झाडाझडती घेतली होती.

जालना रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीत शंभर कोटींचा घोटाळा आणि एक हजार कोटींची सरकारी जमीन हडप केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. त्यानंतर ईडीने अर्जून खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व त्यांच्या घरावर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर खोतकरांनी थेट रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप करत ईडीच्या कारवाईमागे दानवेच असल्याचे म्हटले होते. या आरोपाला दानवे यांनी जालन्यात उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT