Parli News: 'देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का ? असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी मतदारसंघातील जल जीवन मिशन कामाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खद्खद् बोलून दाखवली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट पंतप्रधान पदावरच भाष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एकदा मी शेजारच्या गावात गेले तर तिथले लोक म्हणत होते. ताई तुम्ही फक्त महिला म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नाही, मी विचारलं का असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की, महिला विकास करु शकत नाही. एवढं देऊन पण म्हणतात, महिला विकास करु शकत नाही. एवढं तर कुठल्या पुरुषाने दिलं नाही. मग माझं काही चुकलंय का? माझ्यात काही खोट आहे का? माझ्याकडून कोणाचं काही नुकसान झालंय का, असेल तर तसंही सांगा.
एवढं काम करुन पण तुम्ही म्हणता महिला विकास करु शकत नाही.आज देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर तुमची लेक नाही होऊ शकत का,असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. त्यासाठी तुम्ही एकजुटीने साथ द्यायला पाहिजे. तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता, त्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हटलं जातं का? तुम्ही एकजुटीने साथ द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माणसासाठी काम करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहे. असंही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे.
पण त्यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या निवडणुकीत झालेला पराभव, पक्षातून डावललं जाण्याची भावना यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडेची नाराजी उघड आहे. त्यातच जलजीवन मिशन योजनेच्या भूमीपूजनावरुन गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आतापासून आगामी २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.