Thackeray-Kshirsagar-Fadanvis News
Thackeray-Kshirsagar-Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Beed : ठाकरेंच्या सत्तेत उपेक्षित राहिलेले जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार?

Dattatrya Deshmukh

बीड : स्वत:च्या पक्षाचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अडीच वर्षे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दुय्यम स्थान आणि राजकीय लाभापासून उपेक्षीतच रहावे लागले. (Beed) उलट याच सरकारमध्ये आमदार असलेल्या पुतण्याला पक्षाध्यक्ष शरद पवारांनी लिफ्ट दिली, पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हणावे तेवढे बळ जयदत्त क्षीरसागरांना दिले नाही. त्यामुळे आता नव्या सत्ता समिकरणानंतर जयदत्त क्षीरसागर व बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे आताचे सत्ता समिकरण विद्यमान स्थिती आणि भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारीसाठी त्यांच्या सोयीचे असू शकते. क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) घराणे पुर्वीपासून काँग्रेसी विचारांचे, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेनंतर क्षीरसागरांनी पवारांची राष्ट्रवादी निवडली. पक्षाने त्यांना महत्वाची मंत्रीपदेही दिली. परंतु, धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एंट्री व विरोधी पक्षनेतेपदावर गेल्यानंतर क्षीरसागरांची राजकीय घुसमट होऊ लागली.

याच काळात पुतणे संदीप क्षीरसागर यांनीही बंड केले. पक्षातील क्षीरसागर विरोधकांनी आपले वजन संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यात टाकायला सुरुवात केली. जिल्ह्यात राष्ट्रवादीतून एकमेव विजयी आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर देखील भाजपच्या अधिकच सहवासात गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचा राबता वाढला.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पारड्यात वजन टाकले. लोकसभेत थेट भाजप प्रचार आणि भाजप नेत्यांसोबतचा राबता पाहता क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करतील ही अटकळ साफ चुकली आणि भाजप नेत्यांच्या संमतीनेच त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. त्या काळात त्यांच्यासाठी ही मोठी राजकीय सोय देखील होती. तत्कालिन युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेची होती.

तर, त्यांना प्रवेश केल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये सहा महिन्यांसाठी कॅबीनेट मंत्रीपदही मिळाले. विधानसभा निवडणुकीत व नंतर गणिते अचानक बदलली. जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमधून पराभव झाला आणि युतीही तुटली. परंतु, त्यांच्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, पक्षांतराच्या काळापासून त्यांनी थेट शरद पवारांवर केलेले वार आणि सरकारवरील पवारांचा प्रभाव यामुळे जयदत्त क्षीरसागर कायम सत्ता असूनही ‘चार हात दुर’असेच चित्र अडीच वर्षे होते.

ठाकरेंनी लिफ्ट दिलीच नाही..

इकडे आमदार असलेल्या पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी आणि थेट शरद पवारांचे बळ मिळत असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही राजकीय लिफ्ट दिली नाही. या काळात त्यांचा किंवा प्रमुख शिवसेना नेत्याचा खास क्षीरसागरांसाठी कार्यक्रम किंवा मोठा प्रकल्प असे काही घडले नाही. उलट नगर पालिकेच्या निधी व विकास कामांवरुन सत्ता पक्षात असूनही तत्कालिन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना कायम तक्रारींचे पाढेच वाचावे लागले.

त्यामुळे आता बदलत्या सत्ता समिकरणात जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, क्षीरसागरांचा पिंड तसा शिवसेनेचा नव्हताच. तुलनेने भाजप त्यांच्या अधिक सोयीचे होते. परंतु, त्या काळी पंकजा मुंडे ह्या पालकमंत्री व प्रमुख ओबीसी नेत्या आणि पक्षात तेवढ्याच ताकदीचा दुसरा ओबीसी नेता म्हणजे ‘एका म्यानात दोन तलवारी’ही देखील राजकीय अडचण होती. तसेच बीडची जागाही युतीत शिवसेनेला होती. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा निर्णय घ्यावा लागला.

परंतु, नगर पालिका निवडणुकीचा विचार केला तर शहरातील जातीय समिकरणे शिवसेनेच्या सोयीची नाहीत. त्यामुळे आताही ते शिवसेनेत असले तरी क्षीरसागरांच्या गळ्यात शिवसेनेचे भगवे उपरणे फार कमी वेळा दिसते. भविष्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहीली तर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार असल्याने त्यांना उमेदवारीसाठीही तंटा करावा लागेल.

मात्र, आता शिंदे मुख्यमंत्री असल्याने क्षीरसागरांनी त्यांचा गट स्विकारला तर अडीच वर्षे त्यांना पद मिळाले नाही तरी सत्तेच्या माध्यमातून नगर पालिका व मतदार संघात विकास निधीला मदत होऊ शकते. दुसरीकडे शिवसेनेने त्यांना सत्तेच काही दिले नाही तर आता काय मिळणार हा देखील प्रश्न आहे. भविष्यात भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारी वाटणीत जिल्ह्यात बीडची जागाही सहज शिंदे गटाला सुटू शकते. दरम्यान, या सर्व राजकीय उलथापाथीत क्षीरसागर अद्याप तरी बाजूलाच आहेत. आता सगळे सोयीचे असले तरी क्षीरसागर मार्ग कोणता निवडतात हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT