Ambadas Danve On Name Change News
Ambadas Danve On Name Change News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : `छत्रपती संभाजीनगर' च का ? इतिहासाचे दाखले देत विरोधकांना प्रत्युत्तर..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे `छत्रपती संभाजीनगर`, असे नामकरण केल्यानंतर सध्या राजकारण तापले आहे. विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने सुरू आहेत. एमआयएमने या नामांतराला विरोध दर्शवत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी तर संभाजी महाराजांचा आणि (Aurangabad) औरंगाबादचा संबंध काय? असा सवाल करत नामांतराला विरोध दर्शवला आहे.

छत्रपती संभाजीनगरच का? आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा या शहराशी संबंध काय? हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी इतिहासाचे दाखले देत सांगितले आहे. नामांतराला विरोध करणाऱ्यांना यातून त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे. (Shivsena) दानवे यांनी म्हटले आहे की, जनसामान्यांचे राज्य कसे असावे याचे उत्तम उदाहरण असलेल्या हिंदवी स्वराज्याचे जतन करणारे छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे कूळ आणि मूळ हे वेरूळ अर्थात छत्रपती संभाजीनगरात अनेक शतकांपासून आहे.

वेरूळमध्ये भोसले कुटुंबाची अजूनही गढी आहे. तिथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा पूर्णकृती पुतळा देखील आहे. संबंध जगातील हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेले बारावे ज्योतिर्लिंग अर्थात घृष्णेश्वरच्या जिर्णोद्धारासाठी भोसले कुळाने कार्य केले आहे. त्याचा शिलालेखही घृष्णेश्वर मंदिरात आजदेखील आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवस्तीत संभाजी राजांचे पूर्वज मालोजीराजे भोसले यांच्या नावे 'मालोजीपुरा' (अपभ्रंश - मालजीपुरा) अशी वसाहत आजही अस्तित्वात आहे. महसूल दरबारी त्याची नोंदही आहे.

निझामशाहीचा शेवटचा राजा मुर्तुजा निजामशाह याला मांडीवर बसून राज्यकारभार केला तो याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून. पुरंदरच्या तहादरम्यान संभाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंग याने संभाजी महाराजांना मनसबदार केले होते. या मनसबदारीच्या कालखंडात संभाजी महाराज आजच्या संभाजीनगरात सेनापती नेतोजी पालकर यांच्यासह दीर्घकाळ राहावयास होते. आग्रा येथे औरंगजेबाची भेट घ्यावयास निघालेले शिवछत्रपती आणि संभाजी महाराज शहरात मुक्कामी आले होते.

त्यावेळी या दोघांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती, याचे दाखले इतिहासाचे पुस्तक उघडून पाहिलत तर दिसतील. याचा अर्थ शहरात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या प्रति असलेले आकर्षण त्यावेळी होते आणि नावाच्या रूपाने आजही ते कायम आहे. या मुक्कामादारम्यान जयसिंगपुऱ्यात जिथे शिवाजी महराज पूजेला जात ते मंदिर आजही आहे, त्याचा पुरावा तिथे गेल्यावर आढळतो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या एकाच वर्षात (१६८१) औरंगजेब दक्षिणेत आला.

स्वराज्य बेचिराख करत सुटलेल्या औरंगजेबाला संभाजी महाराजांना युद्धात हरवता येईना म्हणून त्यांना धोक्याने धरले. त्यांची विदूषकी कपडे घालून धिंड काढली, चामडी सोलली आणि त्यावर मिठाचे पाणी टाकून वेदना दिल्या. त्यांच्या शरीराचे तुकडे जोडून अंत्यसंस्कार करावा लागला हे सर्वश्रुत आहे. माणूस संपला म्हणून लढाई संपली नाही. कारण स्वराज्य आणि संभाजी महाराज हे व्यक्ती नव्हे तर विचार होते. म्हणून तर गवताला पण भाले फुटले होते. मराठे २७ वर्ष लढले आणि त्यांनी औरंगजेबाला निर्णायक विजय मिळू दिला नाही.

हा विचार आजही प्रेरणादायी आहे. या विचारावर महाराष्ट्रासारखे राज्य चालते, औरंगजेबाच्या विचारावर नाही. औरंगजेबाच्या बाबजाद्यानी १६१० साली चिकलठाण्याच्या लढाईत मलिक अंबरचा पराभव करून हे शहर पुन्हा उभे राहू नये, असे बेचिराख केले होते. तब्बल १७ वर्षांचा कालखंड देवगिरी किल्ला आणि परिसरातील ६० लाख रुपये महसुलाचा मुलुख देखील मराठेशाहीचा भाग होता. आम्ही पडणारे नाहीत, उभे करणारे आहोत. आमचे आदर्श या राज्यात जन्माला आलेला, या मातीसाठी झिजलेला, लढलेला, प्राण अर्पण केलेला राजा आम्हाला आदर्श हवा आहे.

बापाला कैदेत टाकणारा, भावाचे मुंडके छाटणारा, लेकरांना कैदेत टाकणारा राजा कितीही मोठा असला तरी तो आम्हाला आदर्श म्हणून कधीही न पटणारा आहे. हे उत्तर 'छत्रपती संभाजीनगर' मध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटते. बापाला, भावाला छळणारा माणूस नव्हे तर रयतेची आपल्या लेकराप्रमाणे काळजी वाहणारे आणि मातृभूमीसाठी वीर मरणाला कवटाळणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचे कायमच आदर्श असतील.

आमच्या जन्मदाखल्यावर औरंगाबाद असेलही, पण मृत्यु प्रमाणपत्रावर 'छत्रपती संभाजीनगर' असेल. ही आमची प्रतिज्ञा आहे, संकल्प आहे. आमचे गाव आमचे घर आहे. ते निष्कलंक असावे, हे प्रत्येकाला वाटते. मग इतिहासात असलेले असे कलंक पुसण्यात काय गैर आहे. औरंगजेबाने रायगडाचे इस्लामगड केले, ते परत रायगड झाले. अजिंक्यतारा चे आझमतारा केले, ते परत भविष्यात शक्तिमान मराठ्यांनी बदलले. आता छत्रपती संभाजीनगर हा यावर चढवलेला कळस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT