बीड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिसंवाद दौऱ्याचे नियोजन झाले अन् प्रकाश सोळंके नसल्याने माजलगावचा कार्यक्रम रद्द झाला. तेलगावला पुतणे जयंसिंह सोळंके यांनी जंगी तयारी केली. पण, मी पुन्हा येईन म्हणत जयंत पाटलांनी स्वागत स्विकारुन काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे मंगळवारचे कार्यक्रम रद्द केल्याचे जयंतराव म्हणाले, पण ते जिल्ह्यातच थांबल्याने नेमकी माशी कुठे शिंकली असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. सोमवार व मंगळवारी या दोन दिवशी गेवराई, माजलगाव, परळी, केज व बीड या पाच मतदार संघातील मेळाव्यांचे वेळापत्रक व ठिकाणेही निश्चित झाली.
पण, दौऱ्याच्या आदल्या दिवशी रविवारी प्रकाश सोळंके यांनी आपण हजर राहू शकत नसल्याचे कळवले आणि माजलगावचा नियोजित मेळावा रद्द झाला. पण, पुतणे जयसिंह सोळंके यांनी माजलगावचा रद्द मेळावा तेलगावच्या कारखान्यावर आयोजित केला. या ठिकाणी सगळी जंगी तयारीही करण्यात आली. अगदी नेत्यांचा ताफा पोचेपर्यंत जयसिंह सोळंके यांची उघड्या जीपमधून मिरवणूकही काढण्यात आली.
जयंतराव गेवराईचा कार्यक्रम अटोपून तेलगावला पोचल्यानंतर त्यांचे क्रेनने हार घालून स्वागतही करण्यात आले. मात्र, व्यासपीठावर येऊन मी पुन्हा येईल म्हणत त्यांनी आपले भाषण अटोपते घेतले. प्रकाश सोळंके आल्यानंतर माजलगावला पुन्हा कार्यक्रम घेऊ, उद्याचे (म्हणजे मंगळवारचे) सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचेही त्यांनी व्यासपीठावरुन जाहीर करत परळीला पोचण्यासाठी मला लवकर जावे लागत असल्याचे सांगत काढता पाय घेतला.
पण, सगळे कार्यक्रम रद्द म्हणाले तरी दुसऱ्या दिवशीही जयंत पाटील जिल्ह्यातच होते. मग, काकांच्या अपरोक्ष पुतणे जयंसिंह सोळंके यांनी येवढी जय्यत तयारी करुनही जयंत पाटलांनी मेळावा का टाळला?, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. तसे पाहता मागच्या निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी शेवटची निवडणुक असे जाहीर केल्याने पुतणे जयसिंह सोळंके यांचा हुरुप कमालीचा वाढला आहे. त्यात आता त्यांनी ताकदीने जंगी तयारी करुनही जयंतरावांनी नेमका काढता पाय का, घेतला याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.