परभणी : विकासकामात खोडा आणणऱ्याची मी हयगय करत नसतो, तो जवळचा की लांबचा हे ही पाहत नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला बाणेदारपणा दाखवला होता. नेमकं त्यांच्या या बाणेदारपणावर बोट ठेवत जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी मतदारसंघातील विकासकामात आडकाठी आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर कारवाई करणार का ? असा थेट सवाल केला आहे.
परभणी (Parbhani) जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष नेहमीच होत असतो. त्यात बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यात तर विळ्या भोपळ्याचे वैर आहे. या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्षाची थिनगी अनेकदा निवडणुकीच्या निमित्ताने पडलेली आहे. आता भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी माजी आमदार विजय भांबळे हे मतदारसंघातील विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे.
हा आरोप करतांना बोर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच थेट आवाहन करत आपल्या पक्षाच्या माजी आमदारावर कारवाई करणार का ? असा प्रश्न केला आहे. मतदारसंघातील समाज कल्याण विभागा मार्फत होणाऱ्या विकासकामाचा सव्वाकोटींचा निधी माजी आमदार विजय भांबळे यांच्यामुळे परत गेल्याचा आरोप व पुरावा मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केला आहे.
बोर्डीकर यांनी एक ट्विट करत अजित पवार यांनी विकासकामाच्या आड येणाऱ्यांसंदर्भात केलेले विधान आणि विजय भांबळे यांच्या आडकाठीमुळे परत गेलेल्या निधीचे पत्रच व्हायरल केले आहे. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा आणि यावर अजित पवार काय भूमिका घेतात याची उत्सूकता निर्माण झाली आहे. विकासकामात अडथळा आणला तर ती व्यक्ती आमच्या घरची असो की राष्ट्रवादीची त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही पोलिसांना सांगतो, असे विधान अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
त्याचा संदर्भ देत बोर्डीकर यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातील १ कोटी २६ लाख रुपयांची कामे रद्द केल्याचे परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहीचे पत्रच ट्विट केले. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यावर बोर्डीकरांचा रोख असून त्यांच्यावर आता पोलिसी कारवाई करणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आदरणीय अजितदादा, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निधी मिळण्यास विरोध करणे, मिळालेला निधी रद्द करणे हे विकासकामात अडथळे नाहीत का? पुरावे दिलेत. जिंतूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार हे सगळं करतात, याची भाषणांतून जाहीर कबुलीही देतात त्यांच्य वर करणार का पोलिसी कारवाई? असे मेघना बोर्डीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.