Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

Jalna Assembly Constituency: शिवसेनेकडून पुन्हा अर्जूनास्त्र! विजयाचे लक्ष्य भेदणार का ?

Danve and Khotkar Political Rivalry: 2024 मध्ये लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. या पराभवाला अर्जून खोतकर यांचा हातभार लागल्याचा आरोप केला जातोय. कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री, लोकसेभेत महायुती असून खोतकरांनी विरोधात केलेले काम याचा परिणाम विधानसभेला दिसू शकतो

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election News : शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या जालना मतदारसंघातून अर्जून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाली तर जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हे पाचव्यांदा एकमेकांच्या विरोधात लढतील. तर खोतकर हे आठव्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी 25 हजाराहून अधिकच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याविरोधात अर्जून खोतकर यांनी शड्डू ठोकला होता. पण युती असल्यामुळे ठाकरे-फडणवीसांनी मध्यस्थी करत अर्जूनास्त्र खाली ठेवायला लावले होते.

या बदल्यात विधानसभेला मदतीचा शब्द दानवे यांच्याकडून खोतकरांना मिळाला होता. पण दानवे विजयी झाल्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अर्जून खोतकर यांचा पराभव झाला. दरम्यान, बऱ्याच राजकीय घडामोडी, ईडीच्या चौकशीचा फेरा, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा मनावर दगड ठेवून घेतलेला निर्णय त्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणुक अर्जून खोतकर यांच्यासाठी परीक्षा ठरणार आहे.

शिवाय काँग्रेस खोतकर यांच्यासमोर पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणजे कैलास गोरंट्याल या विद्यमान आमदारालाच मैदानात उतरवण्याची अधिक शक्यता आहे. (Jalna) गेल्या लोकसभा निवडणुकीत खोतकरांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी काम करुन त्यांच्या सलग पाचव्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती. पण त्या बदल्यात त्यांच्या नशिबी विधानसभेला पराभव आला.

2024 मध्ये लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. या पराभवाला अर्जून खोतकर यांचा हातभार लागल्याचा आरोप केला जातोय. कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री, लोकसेभेत महायुती असून खोतकरांनी विरोधात केलेले काम याचा परिणाम विधानसभेला दिसू शकतो, असे बोलले जाते.

अर्थात अर्जून खोतकर यांना याची जाणीव असल्याने त्यांनी यावर मात करण्यासाठी काही रणनिती निश्चितच आखली असणार. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातही सध्या बिनसले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची मदत जालन्यात खोतकरांना होऊ शकते, अस बोलले जाते. दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच मतदारंसघात काँग्रेसच्या डाॅ. कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले होते. आता मराठा आरक्षण आंदोलक जालना विधानसभा मतदारसंघात उमेदवार देतात? की पाठिंबा देण्याची भूमिका यावर अर्जूनास्त्र प्रभावी ठरणार की निष्प्रभ हे निवडणूक निकालानंतर कळेल. तुर्तास जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल अशी पारंपारिक लढत पुन्हा एकदा पहायला मिळू शकते.

खोतकर गेली पाच वर्ष कुठल्याही मोठ्या पदावर नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून ते मतदारसंघात पुन्हा सक्रीय झाले. दरम्यान, काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी त्याचे अनेकदा खटके उडाले. विशेषतः मतदारसंघातील विकासकामांचे श्रेय घेण्यावरून या दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या.

विशेषतः जालन्यात मंजूर झालेल्या शासकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादाची या दोघांमधील लढाई चांगलीच गाजली होती. लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यासाठी जालन्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर भाषणात मेडिकल काॅलेजसाठी अर्जून खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा माझ्याकडे केला होता.

राज्यात, केंद्रात आमचे सरकार आहे, मग मेडिकल काॅलेजला मिळालेल्या मंजुरीचे श्रेय तुम्ही कसे घेता? लाज वाटत नाही का ? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गोरंट्याल यांना फटकारले होते. शिंदे यांनी काँग्रेसच्या विरोधात पुन्हा अर्जूनास्त्र बाहेर काढले आहे, आता ते विजयाचे लक्ष्य भेदणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT